Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Pune › इतिहासाची वर्तमानाशी सांगड

इतिहासाची वर्तमानाशी सांगड

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी 

स्पर्धात्मक परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्र यामधील नोकरीच्या संधी यांचा विचार करून काही विद्यार्थी इतिहासात प्राविण्य मिळवतात; परंतु त्याही पलीकडे जाऊन ऐतिहासिक माहिती आणि इतिहासाची अभ्यासपद्धती यांचा उपयोग प्रसारमाध्यमे, कला, क्रीडा, मनोरंजन, साहित्य, पर्यटन, संग्रहालय, अभिलेखागार या व्यावसायिक क्षेत्रात कसा होईल, याची माहिती दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा व्यावसायिकदृष्टीने अभ्यास करता येणार असून, इतिहासाची पहिल्यांदाच वर्तमानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती मोगल जाधव यांनी दिली आहे.

दहावीचा इतिहासाचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. यासंदर्भात माहिती देताना जाधव म्हणाले, यंदा दहावीची मुले उपयोजित इतिहास शिकणार आहेत. इतिहास आणि इतिहास लेखनातील त्याची मांडणी, यांच्यामधील वैचारिक दुवा आणि सैद्धांतिक दुवा यांचे आकलन झाल्यानंतर, इतिहासाच्या कालक्रमानुसार केल्या जाणार्‍या निवेदनात्मक मांडणीच्या पलीकडचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजेल. त्यामुळे इतिहासाची सांगड वर्तमानाशी आणि भविष्याशी घालता येण्याची बौद्धिक, भावनिक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. ही क्षमता प्राप्त झाल्यामुळे इतिहासाचा उपयोग काय, या प्रश्‍नाचे उत्तर व त्या संबंधीच्या शक्यता समजावून घेण्यासाठी विद्यार्थी सक्षम होणार आहेत.

उपयोजित इतिहास, ही नव्याने पुढे आलेली संकल्पना आहे. हा विषय शिकवण्यासाठी विविध देशांमधील विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आले आहेत. सांस्कृतिक आणि नैसर्गिक  वारशांचे जतन आणि संवर्धनाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर इतिहासाच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. त्यामुळे ऐतिहासिक माहितीचे जतन संवर्धनाच्या प्रक्रियेचे अत्यावश्यक अंग बनले. त्यामुळे लोकांचा सहभाग त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. महाविद्यालयात प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यावसायिक जीवनाची दिशा ठरविण्यात साहाय्य मिळावे, ही 

या पुस्तकाच्या रचनेमागची भूमिका आसल्याचे जाधव यांनी सांगितले. इतिहास हा व्यावहारिक उपयोजनास अनुकूल नसलेला  विषय आहे, हा गैरसमजही या पाठ्यपुस्तकातून दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाठ्यपुस्तकाचा आशय प्रेरक, स्फूर्तिदायक असणे आवश्यक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशात कला, कौशल्ये, क्रीडा, मनोरंजन, स्थापत्य यांचा विकास कसा होत गेला आणि त्यांचा इतिहास आपल्या वर्तमान संस्कृतीशी अजूनही कसा जोडलेला आहे, हे वाचणे, त्याचे आकलन होणे हे विद्यार्थ्यांना निश्‍चितच प्रेरणादायी, स्फूर्तिदायक ठरेल. त्यातूनच संपूर्णत्वाच्या संकल्पनेकडे नेणारी जाणीव समस्यांची उकल करणे, निर्णयक्षमता विकसित होणे, वृद्धिंगत होणे, विश्‍लेषणात्मक विचार सहजपणे करता येणे, या गोष्टींचा विकास होऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध  होणार आहे. त्यामुळे स्थानिक जाणिवा आणि जागतिक जाणिवांमधील एकात्मिकता समजण्यास मदत होईल.विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचा देखील अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्रात एकूण सहा घटक असून, यामध्ये संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामुळे इतिहासाबरोबरच विद्यार्थ्यांना देशातील राजकारणदेखील समजून घेता येणार असल्याचेदेखील जाधव यांनी सांगितले.