Fri, Jul 19, 2019 07:40होमपेज › Pune › ऐतिहासिक वास्तूंचे रखडले नूतनीकरण

ऐतिहासिक वास्तूंचे रखडले नूतनीकरण

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:11AMपुणे : ज्योती भालेराव-बनकर 

ऐतिहासिक शहर अशी पुणे शहराची ओळख आहे. शहरात अनेक ऐतिहासिक आणि वारसा ठरतील, अशा अनेक वास्तू आहेत. यातील काही वास्तूंचे महानगरपालिकेतर्फे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले ‘लालमहाला’च्या नूतनीकरणाचे काम बर्‍याच दिवसांपासून रखडले आहे. या कामांसाठी लागणारा निधी, महानगरपालिकेकडून टप्प्याटप्प्यांने मिळत असल्यामुळे या कामांना विलंब लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र महानगरपालिकेकडून नक्की किती कालावधीसाठी किती निधी मंजूर होतो, याची आकडेवारी मात्र संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली नाही. 

शहरात सध्या लालमहाल आणि सोमवार पेठेत असलेले पुरातन त्रिशुंड गणपतीचे मंदिराची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे; मात्र अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या उत्सवासाठी लालमहाल पर्यटकांसाठी संपूर्ण खुला केला जाईल, अशी अपेक्षा असताना हे काम अर्धवट अवस्थेतच राहिले. या महालाच्या दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील प्रसंगांचे चित्रप्रदर्शन अनेक दिवसांपासून बंदच आहे. पुण्यात अनेक पर्यटक येत असतात. लालमहालाला भेट द्यायला आल्यावर अनेक दिवसांपासून पर्यटकांना अर्धवट बांधकाम सुरू असणारा लालमहाल बघायला मिळत आहे. सध्या या ठिकाणी सगळीकडे बांधकामाचे साहित्य आणि धूळ, लाकूड असे सामान विखुरलेले दिसून येत आहे. या सगळ्यातून जेवढा काही लालमहाल बघायला मिळेल, त्यावरच पर्यटकांना समाधान मानावे लागत आहे. 

असेच काम सोमवार पेठेतील प्रसिद्ध त्रिशुंड मंदिराचे आहे. हे मंदिर बरेच पुरातन आणि शिल्प कलेसाठी दुर्मिळ मानले जाते. गेल्या वर्षापासून या मंदिराच्या नूतनीकरणाचे कामही हाती घेण्यात आले होते. सध्या याचा बराच भाग दुरुस्त करून झाला आहे; मात्र मंदिराच्या समोरील भागाची अजून बरीच डागडुजी बाकी आहे. 

जसा निधी मंजूर होईल तसे त्याच्या कामात वाढ होण्याचे सांगण्यात आले. ठरावीक वेळ घेऊन त्यावेळेतच अशा पर्यटनस्थळांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले पाहिजे. ज्यामुळे पर्यटकांना त्या कामाचा अडथळा वाटणार नाही आणि वास्तूही वेळेत पाहण्यासाठी खुल्या होतील, असे पुणेकर नागरिक म्हणत आहेत. 

महानगरपालिकेकडून आम्हाला जितका निधी मिळतो, त्या प्रमाणात नूतनीकरणाचे काम वाढवण्यात येते. लालमहालाच्या नूतनीकरणाचे काम मोठे आहे. त्या ठिकाणी महालाचे जुने प्रवेशद्वार पाडून, त्या जागी रायगडाच्या दरवाजाची प्रतिकृती असणारा दरवाजा उभारण्यात येणार आहे. यासह दक्षिण व उत्तर बाजूला दगड चुन्यामध्ये बांधकाम केले जाणार आहे. महाराजांच्या काळात अनेक सरदारांनी वापरलेल्या शस्त्रास्त्रांचे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन सुरू करण्यात येणार आहे; मात्र या सगळ्याला किती वेळ लागणार हे सांगता येणार नसल्याचे महापालिकेच्या पुरातत्त्व विभागाने सांगितले.