Thu, Jun 20, 2019 14:38होमपेज › Pune › हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोची जुलैअखेर अंतिम निविदा

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोची जुलैअखेर अंतिम निविदा

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्राधिकरणाने खासगी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या असून, कमीत कमी व्यवहार्यता निधी (गॅप फंडिंग) असणार्‍या कंपनीची महिनाअखेरपर्यंत निविदा मंजूर केली जाणार, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते  यांनी दिली.

हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प 8 हजार 600 कोटी रुपयांचा असून, त्याकरिता केंद्र व राज्याकडून 3 हजार कोटी इतका निधी मिळणार आहे. राज्य शासनाने हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी 888 कोटी रुपये 2018-19 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात दिले आहेत. तर, केंद्राकडून सोळाशे कोटी रुपयांच्या भागभांडवलला मंजुरी दिली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी जागतिक निविदा मागविण्यात आली होती. मात्र, त्याला अपेक्षित  प्रतिसाद मिळाले नाही. त्यामुळे तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर बोलीपूर्व (प्रि-बिड) टाटा रिएल्टी - सिमेन्स, आयएलएफएस आणि आयआरबी या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून, या तिन्ही कंपन्यांच्या निविदा पूर्व पात्रता फेरीत पात्र ठरल्याचे गित्ते यांनी सांगितले. 

निविदा भरणार्‍या कंपनीला पीएमआरडीए जागा ताब्यात घेऊन देणार आहे. एकूण जागेपैकी 15 टक्के जागा वाहनतळ, मेट्रो स्थानक यांच्यासाठी संपादित केली जाणार असून, उर्वरित जागा शिवाजीनगर ते हिंजवडी रस्त्याचीच आहे. संबंधित कंपनीला निविदा देताना निश्चित तिकीटदर, स्थानक संख्या, आरेखन, जागा किती द्याायची हे निश्चित होणार आहे. कराराची प्रत करार करताना जोडली जाणार आहे. ज्या कंपनीला काम मिळेल त्यांना ही सर्व कामे कराराप्रमाणे करावी लागणार असल्याचे आयुक्त गित्ते यांनी सांगितले.

शिवाजीनगर-हडपसर मेट्रो मार्ग  

पीएमआरडीएकडून हिंजेवडी-शिनाजीनगर हा मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे, कामाला लवकरच सुरुवात होईल. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यापासून तीन वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे. या मेट्रोमार्गाचा विस्तार होणार असून, शिवाजीनगर-हडपसर मेट्रो मार्गाचा विकास आराखडा तयार (डीपीआर) केला जाणार आहे.