Thu, Jul 18, 2019 05:08होमपेज › Pune › हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग मोकळा ! 

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग मोकळा ! 

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी 1300 कोटींच्या ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ला (निधी) केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. दिल्लीत बुधवारी झालेल्या एका बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या बैठकीला नगरविकास सचिव, नीती आयोग व पीएमआरडीचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे आता मेट्रोला आणखी गती मिळणार आहे. हा मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाईल. यासाठीच्या प्रस्तावामध्ये केंद्रीय समितीने 7 वेळा त्रुटी काढल्या. सर्व त्रुटी दूर झाल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी दिल्लीतील बैठकीत  केंद्राकडून अपेक्षित  निधीला मंजुरी मिळाली.

हिंजवडी-शिवाजीनगर हा 23.3 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. यासाठी 8313 कोटी खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’साठी पीएमआरडीएकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तयार केला होता. मात्र, या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने हा प्रस्ताव रखडला होता. या सर्व त्रुटींची दुरुस्ती केल्यानंतर अखेर हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र व राज्य सरकार मिळून 40 टक्के निधी ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ म्हणून देणार असून, उर्वरित 60 टक्के निधी खासगी उद्योगांच्या सहभागातून उभारला जाणार आहे. 

राज्य मंत्रिमंडळाने 2 जानेवारीला प्रकल्पाला मंजुरी देऊन 812 कोटींचा निधीही मंजूर केला आहे. केंद्र शासनाकडे 1300 कोटी रुपयांच्या हिश्श्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. हैद्राबाद मेट्रो, मुंबई मेट्रोनंतर पुणे मेट्रो प्रकल्प हा नवीन मेट्रो पॉलिसीप्रमाणे होणारा पहिला प्रकल्प आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी कायमची सुटणार आहे.