Wed, Apr 24, 2019 02:07होमपेज › Pune › हिंजवडी मेट्रो ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प घोषित

हिंजवडी मेट्रो ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प घोषित

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) मार्फत राबविण्यात येत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला राज्यशासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मेट्रो मार्गालगत अंदाजे 30 ते 35 हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या 23.3 किमी लांबीचा असून, 23 स्थानके असलेला मेट्रो रेल प्रकल्प एमआयडीसी, पीएमआरडीए, पीसीएमसी व पीएमसीच्या परिक्षेत्रातून धावणार आहे. मेट्रोच्या 23 स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, क्वाड्रन, डोल्हेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो टेक्नॉलॉजी फेज 2, पाल इंडिया, शिवाजीचौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडीअम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, कृषी अनुसंधान, सकाळनगर, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषीविद्यापीठ, शिवाजीनगर, सिविलकोर्ट येथील जमिनी विकत घ्याव्या लागणार आहेत.  

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या ताब्यातील जमिनीपैकी आवश्यक जमिनीचा ताबा मिळावा यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना सादर केले जाणार आहेत. शासनाने 18 जुलै 2018 रोजी हा प्रकल्प निकडीचा प्रकल्प म्हणून जाहीर केल्याने, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागांचे आगाऊ ताबे जिल्हाधिकारी यांचेकडून पीएमआरडीएला देता येणार आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल व सदर प्रकल्प मार्गी लागण्यास चालना मिळेल, असा विश्‍वास ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्त केले आहे.