Thu, Apr 25, 2019 05:43होमपेज › Pune › हिंजवडीत पुन्हा पोलिसाला मारहाण 

हिंजवडीत पुन्हा पोलिसाला मारहाण 

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:37AMपिंपरी : प्रतिनिधी 

मोटार अडवल्याचा राग आल्याने स्थानिक तरुणांनी पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केली. शुक्रवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास ही घटना वाकड परिसरात घडली. नुकत्याच वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याच्या दोन घटना हिंजवडी परिसरात घडल्या आहेत. 

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी विकी विश्वनाथ कदम यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून निशांत बाबूराव वाकडकर (वय 35), सागर मोहन निकम (वय 22, दोघे रा. वाकडकरवस्ती, वाकड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना वाकड येथील इस्कोटिव्ह सोसायटीसमोर अंधारातून एक संशयित मोटार येत असल्याचे दिसले. कदम यांनी त्या मोटारीला थांबवले. मोटार थांबवल्याचा राग आल्याने त्यातील सागर निकम याने ‘तुम्ही आमची गाडी अडवणारे कोण? आम्ही गाववाले आहोत,’ असे म्हणून वाद सुरू केला. कदम यांनी मला गाडी तपासायची आहे, असे सांगून गाडी तपासण्यास सुरुवात केली. या वेळी वाकडकर याने त्यांची कॉलर धरून मारहाण केली. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले फौजदार गवारी यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. 

सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय?

हिंजवडी परिसरात पोलिसांना मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. नुकतेच वाहतुकीचे नियमन करीत असताना जयराम सावळकर आणि संदीप कारकूड या पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली होती. या दोन घटना ताज्या असतानाच एका फौजदारासमोर पोलिस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावल्याची तिसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे या शहरात पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.