Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Pune › ‘एचए’ कामगारांचा पगार 13 महिने रखडला

‘एचए’ कामगारांचा पगार 13 महिने रखडला

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:53AMपिंपरी ः प्रदीप लोखंडे

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीचे उत्पादन सुरू आहे. चार ते पाच युनिट सुरू करण्यात आले आहेत. कामगारांना 13 महिने पगारच मिळालेला नाही. कंपनी व्यवस्थापनाकडून अधिकार्‍यांना 25 टक्के पगार दिला जात आहे, तर पुर्ण पगार मिळावा या मागणीसाठी कामगारांनी 25 टक्के पगार घेण्याला नकार दर्शविला आहे. त्यामुळे एक वर्ष झाले तरी कामगारांना पगाराविना रहावे लागत आहे. राजकीय नेत्यांकडूनही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

‘एचए’ कंपनीतील कामगारांच्या थकित वेतनाचा प्रश्‍न नवीन नाही. कामगारांना एप्रिल 2017 पासून 13 महिने वेतनापासून वंचित रहावे लागले आहे. पुन्हा वेतन रखडू लागल्यामुळे कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या कंपनीचे पाच युनिट सुरू असल्याची माहिती कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दर महिन्याकाठी कंपनीचे सुमारे चार कोटींचे उत्पादन होत आहे. अधिकार्‍यांना 25 टक्के पगार दिला जात आहे. कामगारांनाही 25 टक्केंनी पगार दिला जाईल असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे; मात्र अधिकार्‍यांचा पगार जास्त असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये अधिकची रक्कम येणार आहे, तर कामगारांचा पगार कमी असल्यामुळे महिन्याकाठी त्यांच्या हातात कमी पगार पडणार आहे. त्यामुळे कामगारांनी 25 टक्के पगार न घेता पुर्ण पगार देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना एक वर्ष झाले तरी पगार मिळालेला नाही. 

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीचा भूखंड घेण्यासाठी देखील वारंवार निविदा काढल्या जात आहेत. या बाबत पुढील कार्यवाही होताना दिसत नाही. दोनवेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे भुखंड विक्रीची प्रक्रिया देखील रखडली आहे. मध्यंतरी केंद्र शासनाने ‘म्हाडा’ला पत्र दिले होते. त्यानुसार चार वर्षांपूर्वी प्रति चौरस मीटर 44 हजार रुपये दराने भूखंड घेण्याची निविदा म्हाडाने भरली होती; मात्र सध्या हा दर परवडत नाही असे कारण त्यांच्यातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे भुखंडाची विक्री झाली नाही. भुखंड विक्री करून कामगारांचे वेतन देण्याच्या विचाराधीन कंपनी असली तरी त्याला अनेक अडचणी येत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.

Tags : Hindustan Antibiotics, HA, pune, pimepri