Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Pune › ‘एचए’ भूखंड विक्रीला मुहूर्त कधी?

‘एचए’ भूखंड विक्रीला मुहूर्त कधी?

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:28AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांच्या रखडलेला पगाराचा प्रश्‍न सुटता सुटेना झाला आहे. हा प्रश्‍न सोडवून कामगारांची देणी देण्यासाठी कंपनीने भूखंडाची विक्री करायचा निर्णय घेतला होता; मात्र अद्यापही त्याची विक्री झालेली नाही. त्यामुळे भूखंड विक्रीला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल कामगार संघटना करत आहे.

पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करीत आहे. कंपनीच्या कामगारांना गेल्या नऊ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगार व कुटुंबीय आर्थिक संकटात आहेत. कामगारांचे वेतन रखडण्याचा प्रश्‍न वारंवार उद्भवत आहे. हे रखडलेले वेतन देण्यासाठी भूखंड विक्री करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार दोन वेळा निविदा काढण्यात आल्या.

यामध्ये ‘म्हाडा’कडून भूखंडासाठी सर्वाधिक रक्‍कम देण्यात आली होती. ‘म्हाडा’कडून 6 एकर भूखंड खरेदी केला जाणार होता. या भूखंडाची रक्‍कम 116 कोटी रुपये होणार होती. या मिळणार्‍या रकमेतून कामगारांची व अधिकार्‍यांची देणी देण्यात येणार होती. दरम्यान, ‘म्हाडा’ने केंद्र सरकारला पत्र दिले असून, हा दर परवडत नसल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे विक्रीचा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुसर्‍यांदा निविदा काढल्यानंतर एकही निविदा सादर झाली नाही. त्यामुळे या भूखंड विक्रीला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. एचए कंपनीच्या भूखंड विक्रीसाठी खासगी बिल्डरांनाही निविदा भरण्यासाठी आवाहन करावे, अशी मागणी एचए मजदूर संघाच्या वतीने केली होती. त्याबाबत केंद्र शासनासोबत तोंडी चर्चाही झाली होती. त्याचीही पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे.