Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Pune › हिंदू महिलाश्रमाच्या मुलींची परीक्षेच्या काळात फरपट

हिंदू महिलाश्रमाच्या मुलींची परीक्षेच्या काळात फरपट

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:43AM पुणे : ज्योती भालेराव-बनकर

पुण्यातील सर्वात जुनी संस्था असणार्‍या हिंदू अनाथ महिला आश्रमाचा ‘अ’ दर्जा काढून घेतल्यामुळे येथील सुमारे अठरा मुलींचे स्थलांतर लोणावळा भाजे येथील ‘संपर्क बालग्राम’ याठिकाणी केले आहे. यातील काही मुली या यंदा दहावीच्या वर्गात शिकत होत्या. लवकरच त्यांची परीक्षा सुरू होणार आहे, मात्र शासनाच्या या निर्णयामुळे परीक्षांच्या काळात त्यांची चांगलीच फरपट होताना दिसत आहे. 

सध्या सगळीकडे परीक्षांचे वारे वाहू लागले आहे. दहावी -बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या अभ्यासाची गडबड  सुरू आहे. आपल्या मुलांना परीक्षेच्या काळात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अनेक पालक त्यांची विशेष काळजी घेत आहेत. एकीकडे सामान्य जीवन जगणार्‍या मुलांची अशी परीक्षांची तयारी चालू असताना, हिंदू महिलाश्रमातील या अनाथ मुलींचा वेळ मात्र भाजे ते पुणे शहर, असा प्रवास करत आहे. 

दोन महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण समितीतर्फे काम पाहणार्‍या बालकल्याण समितीच्या सदस्यांनी या नावाजलेल्या आश्रमाची पाहणी करून ‘क’ दर्जा दिला. या निर्णयामुळे शहरातील माध्यवर्ती भागात असणारा हा आश्रम बंद करावा लागला. येथे राहणार्‍या मुलींना ताबडतोब लोणावळाजवळील भाजे येथील ‘संपर्क बालग्राम’ला हलविण्यात आले. लहान मुलींची  शाळाही लगेच सुरू करण्यात आली; मात्र ज्या मुली दहावी इयत्तेत आहेत त्यांच्या गेल्या पंधरा दिवसांपासून तोंडी परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झालेल्या आहेत. यासाठी या मुलींना भाजे ते पुणे शहर असा प्रवास करावा लागला.

पुढील परीक्षेसाठीही त्यांची अशीच फरपट होणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. शालेय वर्ष संपण्यासाठी अवघे दोन ते तीन महिने बाकी असताना आश्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यामागे काय भूमिका होती, हा आश्रमातील कर्मचार्‍यांसह अनेकांना पडलेला प्रश्‍न आहे. सुरुवातीला या मुलींना या बदलाचा त्रास झाला. हिंदू महिला आश्रमाच्या जागेत राहण्याची सवय असणार्‍या या मुलींना अचानक या बदलाला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांच्यासह आम्हालाही खूप भावनिक त्रास झाल्याचे आश्रमातील कर्मचार्‍यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारातून हे स्पष्ट झाले आहे की, परीक्षेच्या काळात नवीन जागेत, नवीन ठिकाणी रुळण्यासाठी द्यावा लागणारा वेळ प्रशासन नक्कीच वाचवू शकले असते. हा निर्णय घेताना कुठेही मुलींचे हित जपले गेले नसल्याचे दिसून आले आहे.