Mon, Jun 17, 2019 18:49होमपेज › Pune › उच्चशिक्षितांना गुन्हेगारीची चटक

उच्चशिक्षितांना गुन्हेगारीची चटक

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:35AM

बुकमार्क करा
पुणे : पुष्कराज दांडेकर 

वेगवेगळ्या कारणांनी टेक्नोसॅव्ही पुणेकरांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या 80 भामट्यांना सायबर गुन्हे शाखेने मागील 11 महिन्यांत अटक केली आहे. तर, फसवणूक झालेल्या तक्रारदारांना आतापर्यंत 70 लाख 254 रुपयांचा ‘रिफंड’ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व भामटे दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंड, कर्नाटकातून पकडलेले आहेत. त्यांच्यामध्ये नायजेरियन भामट्यांची संख्या जास्त आहे.

पुण्यात मागील पाच वर्षांचा विचार करता सायबर गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. 2017 मध्ये तर 2016च्या तुलनेत ऑनलाईन फसवणुकीबाबत येणार्‍या तक्रारींचा ओघ अडीचपटीने वाढला आहे. एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती विचारून होणार्‍या फसवणुकीत चांगलीच वाढ झाली आहे. याबाबतच्या तक्रारींची संख्या सर्वात जास्त आहे. या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपये खात्यातून परस्पर लंपास केले आहेत.

तर मॅट्रीमोनियल फ्रॉड, लोन फ्रॉड, जॉब फ्रॉडच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी मागील वर्षी 68 सायबर गुन्हेगारांना अटक केली होती. तर, 20 लाख 16 लाख 88 हजार 325 रुपयांचा रिफंड तक्रारदारांना दिला होता. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर कालावधीत पोलिसांनी 80 सायबर गुन्हेगारांना अटक करून 70 लाख 254 रुपयांचा रिफंड दिला आहे.  

दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंडचे सायबर गुन्हेगार सक्रिय 

पुणेकरांना गंडा घालणारे सायबर गुन्हेगार हे दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार झारखंड, कर्नाटक आणि इतर राज्यांतील आहेत. पुणे पोलिसांनी एटीएम डेबिट, क्रेडीट कार्डची माहिती घेऊन फसविणार्‍या सायबर गुन्हेगारांना दिल्ली, नोएडा, बेंगलोर येथून अटक केली आहे. तर, मॅट्रीमोनियल फ्रॉडमध्ये राज्य, तसेच राज्याबाहेरील भामट्यांसह नायजेरियन भामट्यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांना या प्रकरणांचा तपास करण्यासाठी परराज्यात जाऊन गुन्हेगारांना आणावे लागते. 

महिला आणि ज्येष्ठ लक्ष्य 

सायबर गुन्ह्यांमध्ये बळी पडणार्‍यांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. सायबर भामट्यांसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे सोपे सावज असल्याने त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण जास्त आहे. निवृत्तीनंतर गुंतवणूक करण्यासाठी तसेच दुसरा संसार थाटण्याच्या तयारीत असलेल्या ज्येष्ठांना हे भामटे लक्ष्य करतात. त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवून सहजपणे आपल्या जाळ्यात ओढले जाते. 

उच्चशिक्षित तरुणांना चटक 

आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्या सायबर गुन्हेगारांमध्ये टेक्नोसॅव्ही असलेले तरुणांचा जास्तीत जास्त समावेश आहे. लवकरात लवकर पैसा कमविण्याचा आणि कमी गुंतवणुकीत चालणारा हा धंदा असल्याने तसेच, लवकर थांग लागत नसल्याने तरुणांना ऑनलाईन फसवणूक करण्याची चटक लागलेली आहे.