Sun, Apr 21, 2019 00:41होमपेज › Pune › महापालिकेने उभारला सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज

अवघा भक्ती-शक्ती परिसर तिरंगामय

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 27 2018 11:40PMपिंपरी : प्रतिनिधी 

निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान येथे महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण प्रजासत्ताकदिनी झाले. या राष्ट्रध्वजामुळे देशाप्रती राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर,  मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य राजू मिसाळ, उत्तम केंदळे, माजी महापौर आर. एस. कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते.

यावेळी ब्रिगेडीयर ओ. पी. वैष्णव म्हणाले,  शौर्य, वीरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचे प्रतीक भारतीय राष्ट्रध्वज आहे.  राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली तेव्हापासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.

भक्ती-शक्ती चौकातील देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत असल्याची भावना निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी व्यक्त केली. मानवता हाच खरा धर्म असून, या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणाने प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. हे शहर आपले आहे, अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकासकामांत सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड हे देशातील एकमेव स्वच्छ, सुंदर व विकसनशील शहर म्हणून ओळखले जाईल.

शहरातील मनपा शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगातील वेशभूषा परिधान करून, तिरंगी रंगातील हजारो फुगे आकाशात सोडले. भक्ती-शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाऊन निघाला होता. सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.  भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या पथकाने ध्वजगीत सादर केले, तर देहूरोड येथील लष्कर बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले, तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.