Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Pune › अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार हायटेक

अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार हायटेक

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:25AMपुणे : गणेश खळदकर 

राज्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या अकरावीची ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांकडून प्रवेशाचा भाग 1 भरून घेण्यात येत आहे; मात्र यंदाची प्रवेश प्रक्रिया हायटेक राबविण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे मोबाईल अ‍ॅप आणि विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्या सोडविण्यासाठी कॉल सेंटर तयार करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या ‘आयटी विंग’मधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या वर्षी अकरावी प्रवेशासाठी 94 हजार 580 जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशक्षमता वाढली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आतापर्यंत तब्बल 54 हजार 959 विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला भाग भरला आहे. परंतु दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. त्यामुळे या अडथळ्यांवर मात करण्यासाठी शिक्षण विभाग आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात करणार आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणजे अकरावी प्रवेशाच्या पोर्टलचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये काही संघटनांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांची तपासणी करण्यात येणार असून जर काही तांत्रिक चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत.

त्यानंतर दोन महिन्यांसाठी एक कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एजन्सी निवडण्यात येणार असून त्या एजन्सीला विद्यार्थ्यांना प्रवेशादरम्यान येणार्‍या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. एजन्सी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी साधारण दहा ते पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी एक मोबाईल अ‍ॅपदेखील तयार करण्याचा विचार शिक्षण विभागाकडून सध्या सुरू आहे. काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेवरून यंदा ते सुरू होण्याबाबत शंका आहे. मात्र यंदा किंवा पुढच्या वर्षी हे अ‍ॅप कार्यान्वित करण्याचा शिक्षण विभागाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया हायटेक पद्धतीने पार पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र उपसंचालक कार्यालयातील अधिकार्‍यांनी यासंदर्भात सावध भूमिका घेतली असून सध्या तरी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.