पुणे : प्रतिनिधी
ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डी. एस. कुलकर्णी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे तपास सुरू केला आहे. मात्र, त्या तपासात सहकार्य करीत नाहीत. जुजबी माहितीशिवाय काहीही सांगत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी आता फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टच्या आधारावर या गुन्ह्याचा तपास करीत त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात डीएसके व त्यांच्या पत्नीला शनिवारी दिल्लीतून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली. पण, कोठडीत डीएसके चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांना अगोदर ससून रुग्णालयात व नंतर न्यायालयाच्या परवानगीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवत त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. डीएसके रुग्णालयात असल्याने पोलिसांना त्यांच्याकडे तपास करता येत नाही.
पोलिसांनी त्यांच्या पत्नीकडे तपास करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून पोलिसांनी हवी तशी माहिती मिळत नाही. तसेच, त्या तपासालाही सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या ऑडिटरचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या आधारे सध्या डीएसके यांच्या पत्नीकडे चौकशी सुरू आहे. त्या पोलिसांना जुजबीच माहिती देत असून, या गुन्ह्यात डीएसके यांनी केलेल्या व्यवहारांची मूळ कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
डीएसकेंनी आतापर्यंत 39 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून डीएसके यांना चार हजार 45 कोटी रुपयांचे देणे लागत आहेत. यामध्ये ठेवीदार व कर्ज घेतलेल्यांचे 1153 कोटी व बँकाचे 2892 कोटी रुपये डीएसके यांना द्यायचे आहेत. या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलगा चौकशीसाठी हजर
डीएसके व त्यांच्या पत्नी यांचे अटकेचे संरक्षण काढून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पण, डीएसके यांचा मुलगा शिरीष याला अटक करण्यास न्यायालयाचे संरक्षण आहे. परंतु, न्यायालयानेे त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे चार दिवस चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तो तीन दिवस चौकशीसाठी हजर राहिला आहे. पण, त्याने देखील तपासात सहकार्य केले नाही, असे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले.