Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Pune › दुर्गसंवर्धनासाठी परदेशातूनही मदत

दुर्गसंवर्धनासाठी परदेशातूनही मदत

Published On: Aug 30 2018 1:23AM | Last Updated: Aug 29 2018 11:48PMपिंपरी : प्रतिनिधी

सध्या गडकोट व किल्ल्यांची अवस्था सध्या बिकट असून अनेक किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील काही दुर्गप्रेमी संस्था झटत असून गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या वतीने दुर्गसंवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत परदेशातूनही 84 हजार रुपयांची मदत गडसंवर्धनासाठी देण्यात आली आहे. 

आज नोकरी व्यवसायानिमित्त अनेक मराठी बांधव परदेशी स्थायिक झाले आहेत. पण ही लोक जरी नोकरीपाण्यानिमित्त बाहेरदेशी गेली असली तरी जन्मभूमीबद्दल व आपल्या संस्कृतीबद्दल तसेच गडकिल्ले वैभवाबद्दल त्यांनी आजही जाण ठेवलेली असते. असेच आपल्या देशातील काही मंडळी ऑस्ट्रेलिया या देशात व्यवसाय, नोकरीच्या दृष्टीने तेथे स्थायिक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी विनायक रेणके (काका) हे दुर्गप्रेमी गृहस्थ सिडनी येथे गेले होते. या ठिकाणी तेथील मराठी बांधवांच्या आग्रहास्तव सिडनी आकाशवाणी या एफ.एम. वर त्यांनी दुर्गसंवर्धनावर मुलाखत दिली होती. त्यावेळी तेथील नागरिकांनी दुर्गसंवर्धनासाठी  नक्की मदत करू, असा शब्द दिला होता. त्या शब्दाची जाण ठेवत ऑस्ट्रेलिया, सिडनी येथील मराठी बांधवांनी किल्ले तिकोणागडावर दुर्गप्रेमींनी हाती घेतलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी 84,000 रुपयांची आर्थिक मदत देवू केली असून दरवर्षी  तिकोणागडासाठी मदत करणार असाही शब्द या मराठी बांधवांनी दिला आहे.