Fri, Jul 19, 2019 14:14होमपेज › Pune › मेट्रोसाठी बालेवाडीत साडेपाच हेक्टर जागा

मेट्रोसाठी बालेवाडीत साडेपाच हेक्टर जागा

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:02AMपुणे : प्रतिनिधी

पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी येथील 5 हेक्टर 60 आर इतकी शासकीय जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्प बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बांधण्यात येत आहे. या मेट्रो प्रकल्पास आवश्यक सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून, या प्रकल्पाला राज्य शासनामार्फत अर्थपुरवठा केला जाणार नाही. ‘पीएमआरडीए’ला हस्तांतरित होणार्‍या शासकीय व खासगी जमिनीच्या वाणिज्यिक विकासातून निधीची उभारणी करण्यात येणार आहे. 

त्यानुसार निधी उभारण्याचा एक स्त्रोत म्हणून बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक 4/1/1 मधील 5 हेक्टर 60 आर इतकी शासकीय जमीन ‘पीएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासकीय जमिनीतून मंजूर विकास योजनेंतर्गत 30 मीटर व 18 मीटर विकास योजना रस्त्याच्या प्रस्तावाने बाधित क्षेत्र वगळून उर्वरित जमीन महसूल अधिनियम -1966 च्या कलम 40 मधील तरतुदीनुसार भोगवटामूल्य विरहित पद्धतीने देण्यात येणार आहे. या जमिनीचा व्यावसायिक विकास करताना त्रयस्थ हितसंबंध (थर्ड पार्टी इंटरेस्ट) निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.