होमपेज › Pune › चढलेला पारा हापूसलाही असह्य

चढलेला पारा हापूसलाही असह्य

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:19AMपुणे : मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात रत्नागिरीसह कर्नाटकातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने त्याचा फटका हापूसला बसत आहे. आंबा तयार होण्याच्या स्थितीत असताना आवश्यक तापमानापेक्षाही जास्त तापमान असल्याने आंबा खऱाब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा रत्नागिरीच्या हापूसला बसत असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

सध्या बाजारात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुणकेश्‍वर, पावस, संगमेश्‍वर, मिरेबांदर, सावंतवाडी व रत्नागिरी भागातून साडेसात हजार पेटी तर कर्नाटकातील टुमकूर जिल्ह्यातील भद्रावती, शिमोगा, हुबळी तसेच अरसिकेरे, आंध्रप्रदेशातील कृष्णा, विजयनगर, वारंगळ, डमातमचेरूहू तर केरळातून पल्‍लकक्कड येथून जवळपास 20 हजार पेट्या कच्चा आंबा बाजारात दाखल होत आहे. यामध्ये, हापूससह पायरी, लालबाग, तोतापुरी, बदाम, मल्लिका आदी आंब्याचा समावेश आहे. सुरूवातीच्या टप्प्यात वातावरण साधारण असताना बाजारात हापूसची अपेक्षित आवक होत नव्हती. सद्यस्थितीत हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने  कच्च्या हापूसची आवक वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशीच्या जवळपास पोहोचल्याने आंबा भापण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा फटका फळांच्या राजा असलेल्या हापूसला मोठ्या प्रमाणात बसत आहे.

हापूस हा पेटीतच भापून ते कोयेपासून खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटक हापूसच्या तुलनेत रत्नागिरी हापूस आंब्यामध्ये याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा फटका व्यापार्‍यांसह ग्राहकांनाही बसत असल्याचे हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. रत्नागिरी हापूसच्या तुलनेत कर्नाटक हापूसची साल जाड असल्याने हापूस भापण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगून कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, बाजारात दाखल झालेले आंबे हे थंड असतात. पूर्वी साधारण वातावरण असताना जवळपास चार दिवस आंबे झाकून ठेवण्यात येत होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून तापमान वाढल्याने दोन दिवस आंबा झाकून ठेवण्यात येत आहे. आंबा गरम होऊ नये यासाठी दोन दिवसांनी आंब्याच्या पेट्यांवरील तळवट काढून तो हवेवर ठेवण्यात येत आहे.