पिंपरी : प्रतिनिधी
औद्योगिक नगरी आता लवकरच स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला येणार आहे. मात्र एकीकडे विकासाकडे होत असतांनाच दुसरीकडे मात्र शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. आधीच शहरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून त्यात आता अवजड वाहने भर घालत आहेत. शहरात मुंबई, नाशिक तसेच परराज्यातून येणार्या अवजड वाहनाचा मुक्त वावर असून त्यांच्या मुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे.
शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना चोवीस तास मुक्त वावर असल्यामुळे शहरात दाखल होणार्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंचवड दळवीनगर पुल, एच. के फिरोदीया मार्ग, थरमॅक्स चौक, चिंचवड एमआयडीसी, कुदळवाडी, पुर्णानगर, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी या ठिकाणी शहराबाहेरून येणार्या अवजड वाहनांचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शहरातील रिक्षा वाहतूक, सार्वजनिक बससेवा, स्कूल बस व खासगी वाहनांच्या गर्दीत या वाहनांची भर पडत असून शहर वाहतुक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे.
औद्योगिकनगरीची लोकसंख्या 25 लाखांपर्यंत पोहोचली असून वाहनांची संख्या जवळपास अठरा लाखांपेक्षा अधिक आहे. दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत असून पार्कींग व्यवस्थेअभावी अशी खासगी वाहनेही सापडेल त्या जागी लावण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी तर दुहेरी पार्कींगने रस्ते अरुंद बनले आहेत. त्यात अवजड वाहनांनी भर घातली असून या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.
पुणे मेट्रो, बीआरटीएसच्या लेन व अस्ताव्यस्त वाहन पार्कींगमुळे महामार्गावरील निगडी ते दापोडी मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पिंपरी कॅम्प, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर, वाकड, काळेवाडी, दापोडी, सांगवी आदी ठिकाणी मालवाहतुकीचे ट्रक तसेच यात्रेनिमित्त येणार्या लक्झरी बस राजरोस पार्क केल्या जातात. मात्र त्यांच्यावर कोणतीहि कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
अवजड वाहनांना गर्दींच्या वेळेत प्रवेश बंद करावा
इतर शहरात वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी शहराबाहेरून येणार्या अवजड वाहनांना तसेच सहापेक्षा जास्त चाके असणार्या अवजड वाहनांना वर्दळीच्या काळात बंदी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर शहरातील विशिष्ट मार्गावर या वाहनांना बंदी केल्यास वाहतुक कोंडी कमी होईल. शहराच्या सीमेवरच या वाहनांना रोखले तर चाकरमान्यांचे व विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत.
- सचिन जाधव, त्रस्त नागरीक