Sun, Feb 23, 2020 11:34होमपेज › Pune › उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताची शक्यता

उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताची शक्यता

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात वाढत असणार्‍या उन्हाच्या झळांमुळे राज्यातील सर्व भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र असल्याने तेथे उष्माघाताची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.

दरम्यान, पुढील 2-3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून, त्यानंतर बुधवारी (दि. 2)  विदर्भाच्या तुरळक भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.

सध्या राज्याच्या बहुतांश भागात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. अनेक भागातील कमाल तापमानाने 40 अंश सेल्सियसचा टप्पाही पार केला आहे. दुपारच्या वेळी वाढलेला उन्हाचा चटका आणि तीव्र उकाडा असह्य होत असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.  कोकण, मुंबई वगळता राज्यभर गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत रविवारी उल्लेखनीय वाढ, तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, तर विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे मागील काही दिवस सातत्याने 42 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली. मध्य महाराष्ट्रात सरासरी 39 अंश, विदर्भात सरासरी 41 अंश, मराठवाड्यात सरासरी 40 अंश, कोकण व मुंबईत सरासरी 32 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.