Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Pune › आरोग्य सेवा कधी येणार सामान्यांच्या आवाक्यात?

आरोग्य सेवा कधी येणार सामान्यांच्या आवाक्यात?

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

सर्वसामान्यांवर अनियंत्रित खासगी वैद्यकिय सेवांच्या दरांचा प्रचंड आर्थिक बोजा वाढला आहे. आजारांच्या खर्चांमुळे महाराष्ट्रात दरवर्षी 30 लाख जनता दारिद्र्य रेषेखाली ढकलली जाते. हॉस्पिटलमधील उपचारांचे अनियंत्रित दर, महागडे वैद्यकिय शिक्षण, फार्मा कंपन्यांचे नफेखोरी,कट प्रॅक्टिस आणि शासकीय वैद्यकिय सेवांची दुरावस्था यामुळे आरोग्य सेवा महागली आहे. मात्र हे सर्व उघडया डोळयांनी पाहत असताना त्यावर नियंत्रण आणण्यास केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

‘राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रक प्राधिकरण’ (एनपीपीए) ने फार्मा कंपन्या आणि हॉस्पिटल यांच्यामधील नफेखोरी नुकतीच उघडकीस आणली आहे. यामध्ये रुग्णालयांना मिळणारा 6 रुपयांचा सलाईनचा कॉक 1735 टक्के नफा कमवत रुग्णांना मात्र 106 रुपयांना विकण्यात आल्याचे सर्व जगाने पाहिले. इतकेच नव्हे तर सुया, हातमोजे, इंप्लांटस आणि इतर अत्यावशक उपकरणांमध्येही रासरोस 100 ते 1500 टक्के ‘लूट’ होते हे समोर आणले. 

याला कारणीभूत कुचकामी शासकीय वैद्यकिय सेवा ही आहे. सरकारी रुग्णालयांत अपेक्षेप्रमाणे सेवा मिळत नाही आणि तेच खासगी रुग्णालयांच्या पथ्यावर पडत आहे. लपायी होणार्‍या कर्जबाजारीपणामुळे रुग्णांच्या अशा शोषणाला कायद्याने आळा बसलेला नाही. त्यासाठी ‘वैद्यकिय आस्थापना कायदा’ राज्यात आणण्याच्या हालचाली सूरू झाल्या आहेत. पण तो कायदाही खासगी सेवांना कसा पुरक ठरेल याकडेच शासनाने अधिक लक्ष दिले आहे. त्यासाठी गठित केलेल्या समितींमध्ये रुग्णप्रतिनिधींना सुरवातीला स्थान देण्यात आले नव्हते. नंतर देण्यात आले पण त्यांचे रुग्णपुरक मुददे खासगी रुग्ण प्रतिनिधी ऐकायला तयार नव्हते हे वास्तव आहे.

दुसरीकडे नाममात्र दरांत सरकारी जमीन, वाढीव एफएसआय आणि 30 टक्के आयकर बचत करत इमले उभे केलेल्या धर्मादाय रुग्णालयांना दोन टक्के गरीब रुग्ण निधीही बाजुला काढणे त्यांच्या जीवावर येत आहे. इतक्या सवलती घेउनही मनमानी रेट लावत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे काम सुखनैव सूरू आहे. यामुळे आता आरोग्याच्या होणा-या खर्चाच्या जाचातुन सर्वसामान्यांची पिळवणुक बंद होईल अशी आशा करत हा जागतिक आरोग्य दिन सार्थकी लागावा हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे.