होमपेज › Pune › मोबाईल टॉवर्समुळे आरोग्यास धोका

मोबाईल टॉवर्समुळे आरोग्यास धोका

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:40AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत नागरी वस्तीत मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत.  मोबाईल टॉवर्सच्या किरणोत्सर्गामुळे आरोग्याला धोका पोहोचत असून हे टॉवर्स मोकळ्या जागेत स्थलांतरित करा, अशी मागणी जागरुक नागरिक संघटनेने प्राधिकरणाकडे केली आहे. याबाबत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची भेट घेऊन संघटनेचे डॉ.सुरेश बेरी, मनोहर पद्मन, अर्जुन सावंत, जगन्नाथ वैद्य, एकनाथ पाठक, गोकुळ बंगाळ यांनी त्यांना निवेदन दिले . 

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्राधिकरण परिसरात उभे असलेले सर्व टॉवर्स अनधिकृत असून ते रहिवासी इमारतीवर आहेत. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय मंत्रीगटाच्या शिफारसीनुसार शाळा, रहिवासी इमारती व रूग्णालयांजवळ मोबाईल टॉवर्स उभे करू नयेत, असे सुचविण्यात आले आहे. मात्र, त्याचे प्राधिकरणात कुठेही पालन होत नाही. न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मिळाली आहे. नंतर ही स्थगिती उठविण्यासाठी गेल्या चार वर्षांत राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यावर तोडगा निघू शकला नाही.  

सध्या मोठ्या प्रमाणात टॉवर्स वाढले असून केबल खोदाई सुरू आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे, त्या ठिकाणचे टॉवर्स खासगी जागेवरून हलवून ते मोकळ्या जागी किंवा सरकारी इमारतींवर हलवावेत. टॉवर परिसरातील सर्व नागरिकांची कर्करोग, हृदयविकार व अन्य आजारांबाबत पालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत पाहणी करून एक अहवाल तयार करावा. टॉवरच्या रेडिएशनची तीव्रता मोजण्यासाठी आवश्यक  यंत्रणा उभारावी. याबाबत एक समिती स्थापन करून त्यावर सामान्य नागरिक प्रतिनिधी  म्हणून घ्यावेत. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी या केसमध्ये प्राधिकरणाने प्रयत्न करावेत, अशा मागण्या प्राधिकरणाकडे केल्या आहेत.