Thu, Jul 18, 2019 07:00होमपेज › Pune › आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार

आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 10:45PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढत असून वैद्यकीय विभागाच्या वतीने औषध व धूर फवारणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही कामे करण्यासाठी कर्मचार्‍यांची संख्याही कमी आहे. परिणामी शहरात डेंग्यू, मलेरिया, सर्दी व ताप आदी साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. वैद्यकीय विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शहरातील नागरिकांना फटका बसत आहे. 

नद्यांमधील प्रदूषणामुळे जलपर्णीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरात डासांची संख्या वाढत आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात जुलै महिन्यामध्ये नऊ दिवसांत डेंग्यूचे 62 संशयित तर 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या महिन्यामध्ये नऊ दिवसांत 1609 तापाचे रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यामध्ये मलेरियाचे 4 पॉझिटिव्ह व डेंग्यूचे 94 संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. अनेकदा यामध्ये खरी माहिती समोर आणली जात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हा आकडा अधिक असल्याची शक्यता शहरातील नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे.

पावसामुळे शहरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत आहे. अनेक ठिकाणी गटारेही तुंबलेली आहेत. ओसंडून वाहणार्‍या कचराकुंड्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले असते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध व धुर फवारणी केली जाते. ही फवारणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडे कर्मचार्‍यांचीदेखील वानवा आहे. दोन ते तीन कर्मचार्‍यांकडून प्रत्येक प्रभागामध्ये धुर फवारणी केली जात आहे. ज्या घरांमध्ये डेंग्यूचा रूग्ण आढळेल त्याच्या घराच्या 100 मीटर परिसरातच धूर फवारणी करण्याचा नियम आहे. अनेकदा या ठिकाणीही धूर फवारणी होत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. याबाबत वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. पवन साळवे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.