Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Pune › ‘डिटेक्शन’चे आकर्षण; पण ‘कन्व्हेक्शन’ नाही 

‘डिटेक्शन’चे आकर्षण; पण ‘कन्व्हेक्शन’ नाही 

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

गुन्हा उघडकीस आणल्यानंतर त्याची वाहवा होते. आरोपींसोबत फोटोही काढले जातात. मात्र, त्यानंतर न्यायालयात आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी तेवढे प्रयत्न केले जात नाहीत. ‘डिटेक्शन’चे आकर्षण आहे, पण कन्व्हेक्शनचे (गुन्हे दोषसिद्धी) नाही. पोलिसांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा योग्य वापर करत एकत्रित काम केल्यास कन्व्हेक्शन रेट वाढेल, असे मत राज्य गुन्हे अण्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी व्यक्‍त केले. 

महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 2016 ते 2017 मधील उत्कृष्ट अपराधसिद्धी; तसेच चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिस संघाने मिळवलेल्या पदक विजेत्यांचा गौरव त्यासोबतच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस व पुरस्काराच्या वितरणप्रसंगी संजय कुमार बोलत होते. या वेळी अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक डॉ. जय जाधव, पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 2009 पर्यंत कनव्हेक्शन रेट 8.1 टक्क्यांपर्यंत होती. तो आता 34 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, तो 50 टक्क्यांपर्यत नेण्याची आवश्यकता असल्याचे या वेळी संजयकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, पोलिसांनी एकत्रित येऊन चांगला तपास करणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात कनव्हेक्शन रेट 50 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

गेल्या काही वर्षांमध्ये राज्य सरकारकडून पोलिस दलात अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब व्हॅन, सायबर फॉरेन्सिक लॅब, डिजिटल ऑडीटर, फॉरेन्सिक ऑडिटर नेमलेले आहेत. याचा वापर आपण कसा करून घेता,  हे महत्त्वाचे आहे. जो पर्यंत व्यवस्थित पुरावे मिळत नाहीत, तो पर्यंत चार्जशिट दाखल करण्याची गडबड करू नये. गुन्ह्याच्या तपासासोबतच शिक्षा कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण 16 वरून 42 टक्क्यापर्यंत पोचले आहे. तर, खुनाच्या घटनांमध्ये 16 वरून 30 टक्क्यापर्यंत शिक्षेचे प्रमाण गेले आहे. मात्र, खुनाचा प्रयत्न कलम 307 च्या गुन्ह्यांमध्ये कनव्हेक्शन होत नाही. न्यायालयीन कर्मचार्‍यांची यात महत्त्वाची भूमिका आहे, असेही संजयकुमार यांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण तपासात महिलांनी भाग घेणे गरजेचे आहे. ते सध्या दिसत नाही. महिला कर्मचार्‍यांचा सहभाग वाढल्यास मोठा बदल दिसून येईल.