Thu, Aug 22, 2019 14:47होमपेज › Pune › भर रस्त्यावर इंजिनिअर तरुणीचे घेतले चुंबन

भर रस्त्यावर इंजिनिअर तरुणीचे घेतले चुंबन

Published On: May 16 2019 2:11AM | Last Updated: May 16 2019 2:23AM
पुणे : प्रतिनिधी

भर वर्दळीच्या एमजी रोडवर भरदिवसा एका इंजिनिअर तरुणीचे चुंबन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्वत:चा मोबाईल बंद पडल्याने  तिने रस्त्यावरून जाणार्‍या एका व्यक्तीचा फोन घेतला. यानंतर त्याला धन्यवादासाठी तिने हात पुढे केल्यानंतर त्याने चक्क चुंबन घेतले. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरींगचे शिक्षण घेते. तत्पूर्वी एका मित्राला भेटण्यासाठी तिला कोरेगांव पार्क परिसरात जायचे होते. परंतु, एमजी रस्त्यावर आल्यानंतर तिला रस्ता समजत नव्हता. मित्राला कॉल करत असतानाच तिचा मोबाईल बंद पडला. यामुळे तिने रस्त्यावरून जाणार्‍या एका व्यक्तीकडे मित्राला कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. त्याने मोबाईल दिला. तरुणीने मित्राला कॉल करुन पत्ता विचारला. त्यानंतर तिने संबंधित व्यक्तीला त्याचा मोबाईलही परत दिला. तू माझ्या मोबाईलवरून कॉल केला आहेस. आता तुझा क्रमांक दे, असे त्याने सांगितले. तरुणीने त्याला स्वत:चा मोबाईल क्रमांक दिला आणि धन्यवादासाठी हात पुढे केला. यावेळी आरोपीने तरुणीच्या हाताचे चुंबन घेऊन तिला जवळ ओढले. भररस्त्यात हा प्रकार झाल्याने तरुणी प्रचंड भयभीत झाली. ती रडत-रडत तेथून पळाली. यानंतर तिने मित्राची भेट घेऊन त्याला ही घटना सांगितली. त्यानंतर दोघेही लष्कर पोलिसांकडे गेले. यावेळी हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तत्काळ परिसरातील ‘सीसीटीव्ही’ची पडताळणी केली. त्यात आरोपी कैद झाला आहे. त्यावरून त्याचा शोध घेतला जात आहे.