Tue, Apr 23, 2019 13:51होमपेज › Pune › घातक प्रदूषकांमुळे श्‍वास घेणेही धोक्याचे

घातक प्रदूषकांमुळे श्‍वास घेणेही धोक्याचे

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 11:25PMअपर्णा बडे

पुण्याला स्मार्ट सिटी म्हणून ओळख करून देताना पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये म्हणून उपयायोजना करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेला पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल हा केवळ ‘माहिती अहवाल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील पयार्र्वरणाला धोका नसल्याचे अप्रत्यक्ष गोडवे गाणार्‍या महापालिकेच्या या अहवालाची पोलखोल आजपासून...पुणे :  शहराचे पर्यावरणीय आरोग्य ढासळले असल्याची वस्तुस्थिती असताना याला बगल देऊन केवळ गोडवे गाण्याचा प्रयत्न यंदाच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी घातक प्रदूषकांमुळे श्‍वास घेणेही धोक्याचे असल्याचा इशारा केवळ एका ओळीत आटोपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही या अहवालात केला आहे.  

घातक वायू हवेत मिसळण्याचे प्रमाण अधिक

महापालिकेच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता कमी होण्यास वाहनांचा सर्वाधिक वाटा असल्याचे नमुद केले आहे. वाहनांतून बाहेर पडणार्‍या  धुरातून सल्फर, नायट्रोजन, कार्बन असे घातक वायू हवेत मिसळत आहेत. परिणामी  हवेत तरंगणार्‍या धूलिकणांचे प्रमाण वाढले असून पुणेकरांच्या श्‍वसन संस्थेवर परिणाम होत आहे, असे सांगण्यात आले आहे. 

सल्फर, नायट्रोजन, कार्बनचे प्रमाण वाढले

सल्फर संयुगाच्या वाढत्या पातळीमुळे श्‍वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे असे श्‍वसनाचे विकार जडतात. ही सल्फर संयुगे हडपसर येथे सर्वाधिक प्रमाणात आढळली असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ही पातळी सर्वच ठिकाणी सातत्याने वाढत असल्याचे तक्त्यावरून दिसून येत आहे. हवेतील नायट्रोजन संयुगाची पातळी वाढल्यावर फुफ्फुसांचे कार्य मंदावते. या संयुगाची पातळी  हडपसर व मंडई येथे अपेक्षित मानकापेक्षा अधिक असल्याचे सांगितले आहे. मात्र ही वाढ मागील तीन वर्षांपासून सातत्याने नवी पेठ, मंडई, हडपसर या ठिकाणी  वाढल्यानंतरही पालिकेने त्याबाबत काय उपाययोजना केल्या याचा उल्लेख नाही.

पुण्यातील हवेत सातत्याने धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. पीएम 10 या धूलिकणांची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  दिलेल्या मानकापेक्षा शहरात सर्वत्र अधिक आहे. त्याचप्रमाणे अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाणही सर्वत्र वाढले असून हडपसर येथे सर्वाधिक आहे. या धूलिकणांमुळे श्‍वसन व फुफ्फुसाचे रोग होण्याची भीती आहे. त्वचेच्या कर्करोगाला कारणीभूत असलेल्या ओझोन वायूचे सर्वाधिक प्रमाण  कात्रज येथे आढळून आले आहे.

हवेतून पसरणार्‍या  संसर्गजन्य रोगांमुळे आरोग्यही ढासळले

दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे पुणेकरांना श्‍वसनाचे फुफ्फुसांचे आजार जडत आहेत. मात्र त्याचबरोबर हवेच्या माध्यमातून पसरणार्‍या संसर्गजन्य रोगांची लागणही मोठ्या प्रमाणात होत आहे.हवेतील विषाणूंमुळे  आणि खालावलेल्या प्रतिकारशक्तीमुळे गतवर्षी 703 पुणेकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली. हवेच्या घटत्या  गुणवत्तेमुळे पुणेकरांची प्रतिकारशक्ती घटत आहे. हवेची ढासळलेली गुणवत्त याला कारणीभूत आहे. मात्र याला काहीसुद्धा महत्त्व पर्यावरण विभागाने अहवालात  दिले नाही.