Sat, Feb 23, 2019 03:56होमपेज › Pune › कुटुंब नियोजनात ‘हवेली’ अव्वल

कुटुंब नियोजनात ‘हवेली’ अव्वल

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:40AMपुणे ः नरेंद्र साठे

वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासकीय नोकरीत असणार्‍यांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सक्तीची केली होती. त्याचा परिणाम दिसून येत असल्याने दोन अपत्यांपेक्षा अधिक अपत्य असल्यास शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याकडे कल वाढला आहे. 2017-18 मध्ये पुणे जिल्ह्यात 19 हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यात पुणे शहरालगत असलेला हवेली तालुका आघाडीवर आहे.

‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आत्मसात करत शहरी भागासह ग्रामीण भागात ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. जिल्ह्यात 2017-18 मध्ये 19 हजार 086 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यात 4 हजार 682 शस्त्रक्रिया झाल्या असून त्या उद्दिष्टापेक्षा 14 टक्के अधिक आहेत. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागातही छोट्या कुटुंबाची बिरुदावली रुजविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे.

त्यापैकी दोन अपत्यांवर 14 हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दोनपेक्षा अधिक अपत्यांवर शस्त्रक्रिया करणार्‍यांच्या संख्येत घट होत असून, एक किंवा दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणार्‍या महिलेस 500 रुपये दिले जातात. पुरुषास दीड हजार रुपये मिळतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केल्यास जाण्या-येण्यासाठी वाहन, राहण्याची सुविधा दिली जाते़  मोफत औषधोपचार केले जातात.

सर्व आरोग्य केंद्रात प्रसूतीची सुविधा

जिल्ह्यात एकूण 96 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतिगृह कार्यरत आहेत. प्रसूतिगृहात अत्याधुनिक सुविधा असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्याकडेही कल वाढत आहे. त्यापैकी 89 आरोग्य केंद्रांत कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे.