होमपेज › Pune › अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन!

अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून हवन!

Published On: May 04 2018 2:00AM | Last Updated: May 04 2018 1:57AMपुणे : विशेष प्रतिनिधी 

ग्रामीण हद्दीतील काही अवैध धंदेवाल्यांनी पोलिस अधिक्षकांची बदली होऊ नये म्हणून देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. एकाने तर यासाठी होम हवन केले; तर काही जणांनी तिरुपती वारी करून त्यासाठी नवस बोलले आहेत. 

पोलिस अधीक्षक म्हणून सुवेझ हक यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी विशेष पथके निर्माण केली. तर प्रभारी अधिकारी रात्रीची गस्त खरोखर घालतात का हे पाहण्यासाठी त्यांना व्हॉटस अ‍ॅपवर कारवाईचे फोटो पाठविण्याची सक्ती केली होती. मात्र गेल्या आठ, नऊ महिन्यात जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

यामध्ये जुगार , मटका, राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधून भंगार, तेल काढण्याचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. या धंदेवाल्यांना प्रभारी अधिकारी त्यांच्यावरील दोन तीन वरिष्ठांनाच हप्ते द्यावे लागतात. यापुर्वी पोलिस अधीक्षकांना मोठ्या प्रमाणावर हप्ता द्यावा लागत होता. परंतु सुवेझ हक हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याने या अवैध धंदेवाल्यांचे हप्त्यापोटी देऊ लागणारे लाखो रुपये बचत होऊ लागले आहेत. 

जिल्ह्यातील एका मटका धंदा चालविणार्‍याने अधीक्षक बदलून जाऊ नयेत म्हणून नागपंथीय साधूंना बोलावूून होम हवन केले. तर भंगारचा धंदा करणार्‍या दोघांनी तिरुपतीला जाऊन अधीक्षकांची बदली होऊ नये म्हणून चक्क नवस बोलले आहेत.