होमपेज › Pune › 'नाहीतर भाजपमध्ये इनकमिंगपेक्षा दुपटीने आऊटगोईंग होईल'

'नाहीतर भाजपमध्ये इनकमिंगपेक्षा दुपटीने आऊटगोईंग होईल'

Published On: Dec 27 2017 12:20PM | Last Updated: Dec 27 2017 12:25PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षामधील इनकमिंग आता बंद झाले आहे. ज्यांचे  इनकमिंग झाले होते, त्यांचे पुन्हा आऊटगोईंग सुरू झाले आहे. म्हणून पहिल्यांदा ज्यांनी इनकमिंग केले आहे, त्यांनाच सांभाळण्याचे  काम करा; नाहीतर इनकमिंगपेक्षा दुपटीने आऊटगोईंग होईल, असा टोला  राज्याचे माजी सहकारमंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक  सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था उंदरा-मांजरासारखी झाली असल्याचे वक्‍तव्य केले आहे; तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वेडा आणि खुनी सोडून सगळ्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याबद्दल नाराजीचा सूर आळविल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता त्यांनी वरील टिपणी केली.

कोणत्या पक्षाच्या अध्यक्षांनी  कोणत्या पक्षाबाबत काय वक्‍तव्य करावे, हा ज्याच्या-त्याच्या उंचीचा आणि विचारांचा प्रश्‍न आहे. काँग्रेस हा 132 वर्षे जुना पक्ष आहे. पक्षाची अवस्था काय हे गुजरातच्या निवडणुकीने दाखवून दिलेले आहे. राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन आलेला नसून, सत्तांतर होत राहते. 2014मध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, आम्ही कमी पडलो  असलो तरी संपूर्ण पक्ष उंदरा-मांजरासारखा  झाला, असे वक्‍तव्य योग्य नसल्याचेही ते म्हणाले. 

ऊस तोडणी वाहतूक दर कपात अंतरनिहाय करण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आपल्याकडे अर्धा व एक एकर क्षेत्र असलेले शेतकरी 70 टक्के आहेत. राज्य सरकारने घाईघाईने हा निर्णय घेतलेला आहे. औरंगाबाद   उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सभासद अथवा बिगरसभासद असला तरी त्याच्या उसावर गळ्या दराची आकारणी करता येणार  नसल्याचे आदेश दिले आहेत. तसे साखर आयुक्‍तांनाही आम्ही कळविले आहे. कारण पुढे जाऊन कालांतराने उतार्‍यानुसार उसाला दर द्यावा, अशीही  मागणी पुढे येऊ शकते; त्यामुळे काढण्यात आलेल्या परिपत्रकाला कोणत्याही कायद्याचा आधार नसल्याचे माझे मत आहे.