Fri, Apr 26, 2019 02:00होमपेज › Pune › हॅरिस समांतर पुलाचे काम पावसाळ्यानंतरच

हॅरिस समांतर पुलाचे काम पावसाळ्यानंतरच

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:29AMपिंपरी : मिलिंद कांबळे

बोपोडीतील गांधीनगर झोपडपट्टीच्या जागेअभावी बोपोडीहून दापोडीकडे येणार्‍या पुलाचे काम रखडले आहे. पावसाळ्यात चार महिने काम करता येत नसल्याने आता हे काम पावसाळ्यानंतरच पूर्ण होणार हे स्पष्ट झाले आहे. या विलंबास जबाबदार असणार्‍या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या वतीने दापोडीतील हॅरिस पुलास समांतर दोन पुलाचे काम सुरू आहे. या कामांची मुदत मे 2018 अखेरीस संपत आहे. गांधीनगर झोपडपट्टीचे स्थलांतर करून सदर जागा ताब्यात देण्यास पुणे महापालिकेकडून विलंब होत आहे. बाधीतांचे औंध येथे सदनिकांचे वाटप केले आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने विरोध केल्याने हे स्थलांतर रखडले आहे. परिणामी, जागा ताब्यात घेण्यास अडचण कायम आहे. त्या संदर्भात ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून त्या प्रकरणास प्रथमच वाचा फोडली होती. 

दरम्यान, पुलाच्या कामासाठी मुळा नदीवर ठेकेदाराने तात्पुरता बंधारा टाकला आहे. त्याची मुदत 31 मे रोजीपर्यंतच आहे. उर्वरित 21 दिवसच या ठिकाणी काम करता येणार आहे. त्यानंतर हा बंधारा काढण्याचे पाटबंधारे विभागाचे सक्त  निर्देश आहेत. पावसाळ्याच्या  पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे विभागातर्फे ही खबरदारी घेण्यात येते. त्यानंतर पावसाळ्याचे 4 महिने काम करता येणार नाही. त्यामुळे बोपोडी ते दापोडी पुलाचे काम पावसाळ्यानंतरच हाती घेता येणार आहे. 

तसेच, या महिन्यातच झोपडपट्टीचे स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण न केल्यास पावसाळ्यात ती करता येणार नसल्याने आणखी विलंबाची दाट शक्यता आहे. दरम्यान, औंध येथे स्थलांतरास झालेला विलंब, त्यास होणारा विरोध या घटनामुळे विकासकाम अडकून पडले आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बोपोडीतील बाधितांना औंधमधील सदनिकांचे कुलूप उघडण्यास तेथील गुंड प्रवृत्तीची मंडळी अजूनही विरोध करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. नागरिकांनी पोलिस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे.दरम्यान, पूलाच्या कामासाठी त्वरीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत पुणे पालिकेस पत्र दिले असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे पिंपरी-चिंचवड पालिकेचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.