Mon, Mar 25, 2019 09:16होमपेज › Pune › हॅरिस समांतर पुल वाहतुकीस बंद

हॅरिस समांतर पुल वाहतुकीस बंद

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:01PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पिंपरीहून पुण्याकडे जाणारा दापोडीतील हॅरिस समांतर पुल वाहतुकीस बंद करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीस खुला केल्यानंतर तासाभरात तो बंद केला गेला.हॅरिस समांतर पुलाचे काम मे अखेरीस पुर्ण झाले आहे. तसे, पत्र पालिकेने स्थापत्य विभागास 30 मे रोजी महापौर नितीन काळजे यांना दिले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुल वाहतुकीस खुला करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांची तारीख उपलब्ध होत नसल्याने उद्घाटनास विलंब होत असल्याचे पालिका प्रशासनाचे मत आहे. 

पूर्ण तयार होऊन जूनचा निम्मा महिना उलटता तरी, पालिकेच्या वतीने सदर पुलाचे उद्घाटन केले जात नसल्याने रोष वाढत आहे. या संदर्भात ‘हॅरिस समांतर पुलास पुणे पालिकेचा अडसर; पुल वाहतुकीस खुला करण्यास वेळकाढूपणा’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने 13 जूनला ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. मंत्र्यांची वेळ मिळविण्यात वेळ घालविला जात आहे. मात्र, वाहनचालकांची गैरसोय होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (दि.16) सदर पुलाचे अचानक उद्घाटन करीत पुल वाहतुक खुला केला. तेथील अडथळे व लोखंडी बॅरिकेटस बाजूला हटवून वाहतुकीस रस्ता मोकळा करताच, पुलावरून मोठ्या संख्येने वाहने धावू लागली. मात्र, तासभरात सदर पुलावर बॅरीकेट लावून वाहतुक बंद करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांना पूर्वीप्रमाणे जुन्या हॅरिस पुलावरून वाहतुक करावी लागत आहे. पालकमंत्र्यांची वेळ मिळताच तात्काळ पुल वाहतुकीस खुला केला जाईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.