Sun, Jul 21, 2019 10:01होमपेज › Pune › सॉफ्टवेअरसह हार्डवेअर दिसणार मराठीमध्ये  मराठी भाषा पोहोचणार जागतिक स्तरावर

कॉम्प्युटर मराठीमध्ये येणार, अवघड सोपे होणार ! 

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी

राज्य मराठी विकास संस्थेतर्फे संगणकाचे मराठीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे इंग्रजी भाषेत दिसणारे सॉफ्टवेअर, संगणकीय भाषा संपूर्ण मराठी भाषेमध्ये पाहायला आणि वापरायला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरच संगणकाची मराठी आवृत्ती संगणक आणि मराठी भाषेवर प्रेम करणार्‍यांना मिळणार आहे.

यावर जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने काम करण्यास सुरुवात केली असून सॉफ्टवेअरसह हार्डवेअर मराठीमध्ये बसवण्याचे काम सुरू झाले आहे. आजच्या काळात संगणकात महत्त्वाचा भाग असणारे सॉफ्टवेअरचे हक्क खरेदी करणे ही बाब अत्यंत खर्चिक झाली आहे. या उपक्रमांतर्गत सॉफ्टवेअरच्या हक्कावर आणि संगणकाचा वापर करताना भविष्यात खर्चात भर पडू नये म्हणून उपाय शोधण्यात आले आहेत. यामध्ये, मोफत आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार असल्यामुळे संगणकाच्या वापरकर्त्याला सॉफ्टवेअरचे हक्क विकत घ्यावे लागणार नाही.

त्यामुळे, मराठी भाषेमध्ये वापरायला मिळणारे हे संगणक माफकसुद्धा असणार आहे. त्यासाठी, लिब्रे ऑफिस (वर्ड, एक्सेल, पॉपरपॉर्ईंटला पर्याय), गिम्प (फोटोशॉपचा पर्याय), फॉण्टपोर्ज (टंकलेखनाचे सॉफ्टवेअर), ओड्यासिटी (ऑडिओ सॉफ्टवेअर), केडेनलाइव्ह (व्हिडिओ सॉफ्टवेअर) या ओपन सोर्स सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे. संगणक क्षेत्रातील कृषी, वैद्यक, उद्योग, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे आदी व्यवहार क्षेत्रातील विविध संस्थांच्या मदतीने हा संगणक तयार होतो आहे. या मराठी संगणकामुळे मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

मराठीमध्ये दोन नवीन फॉन्ट

मराठी फॉन्टचे योग्य रूप, मराठी भाषेमधील भावचिन्ह (इमोजी), गणितीय चिन्हे आणि सांगीतिक चिन्हांचासुद्धा समावेश या संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये करण्यात येणार आहे. या संगणकासाठी यशोमुद्रा आणि यशोवेणू हे दोन नवीन मराठी फॉन्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्य मराठी विकास संस्था त्यावर काम करते आहे.

मराठी जगभर पोहोचावी म्हणून उपक्रम

इंग्रजी भाषेप्रमाणे मराठी ही भाषा संपूर्ण जगामध्ये पोहोचावी, यासाठी या संगणकाची निर्मिती करण्यात येत आहे. या संगणकातील सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी काम करीत आहेत. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. या संगणकाचा वापर समाजातील प्रत्येक घटकाने करावा यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात येत आहेत.   - आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.