Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Pune › ‘हापूस’ची पुणेकरांकडे पाठ

‘हापूस’ची पुणेकरांकडे पाठ

Published On: Apr 25 2018 2:01AM | Last Updated: Apr 25 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

हापूसचा हंगाम सुरू होऊन बराच कालावधी उलटला तरी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रत्नागिरी हापूस मागणीच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात दाखल होत आहे. मुंबईतील मार्केट रविवारी 
बंद असल्याने येथील फळबाजारात रविवार वगळता हापूसची अपेक्षित आवक होताना दिसत नाही. तसेच, पुण्याच्या तुलनेत मुंबईला मागणी व दर अधिक असल्याने यंदा शेतकर्‍यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळविल्याने हापूसने पुणेकरांकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहेपुणे, मुंबई आणि नागपूर या राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समित्या आहेत. मुंबई बाजारात सध्यस्थितीत दररोज 40 हजार रत्नागिरी हापूसच्या पेट्या दाखल होत असल्याचे सांगून व्यापारी युवराज काची म्हणाले, मुंबई येथील मार्केटमध्ये आंब्याची विक्री केल्यास शेतकर्‍यास हापूसच्या पेटीमागे 500 ते 1000 रुपयांनी अधिक दर मिळतात. त्यामुळे येथील शेतकर्‍यांकडून मुंबईतील मार्केटमध्ये माल पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. 

रविवारच्या दिवशी मुंबईतील बाजार हा बंद राहतो. नागपूरला माल पाठविणे शक्य नसल्याने शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात माल शहरातील बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतो. परिणामी, इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी हापूसची सर्वाधिक आवक होते. याखेरीज, गुलटेकडी मार्केट यार्डात आंब्यासाठी पुरेशी जागा व रायपनिंग चेंबर उपलब्ध नसल्याने आवक वाढून दर घसरतील या भीतीने शेतकरी माल पाठविण्यास धजावत नाही. त्यामुळे, शेतकरी मुंबईकडे वळाल्याचे दिसून येते.  

रत्नागिरी हापूसला मुंबईसह अहमदाबाद येथूनही मोठ्या प्रमाणात मागणी राहते. सध्यस्थितीत येथील स्थानिक भागातून आंब्याची आवक सुरू झाली नाही. त्यामुळे, रत्नागिरी हापूसला मागणी होत असून पुणे व मुंबई बाजाराच्या तुलनेत जास्त दर मिळत असल्याचा परिणामही शहरातील आवकेवर दिसून येतो. यंदाच्या वर्षी उत्पादनात झालेली घट आणि मुंबईसह परराज्यातून मागणी वाढल्याने बाजारात कच्च्या मालाची आवक घटली आहे. तसेच, तयार माल उपलब्ध नसल्याने आणि आवाक्याबाहेर असलेले दर यामुळे पुणेकरांना इच्छा असूनही हापूसची चव चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही काची यांनी नमूद केले. 

Tags : Pimpi, Hapus, Mango,  available,  pune