Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Pune › ‘बाबांना मारणार्‍यांना फासावर लटकवा’

‘बाबांना मारणार्‍यांना फासावर लटकवा’

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:54AMआळंदी : वार्ताहर

‘साहेब, माझ्या बाबांना मारणार्‍या मारेकर्‍यांना फासावर लटकवा,’ अशी आर्त विनंती दिवंगत नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या चिमुकल्या परीने ऊर्फ तनिष्काने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार सुरेश गोरे यांना केली. भावुक झालेले कुटुंब टाहो फोडून रडू लागले. 

भर दिवसा मंगळवारी (दि. 26) निर्घृण हत्या झालेल्या भाजप नगरसेवक कांबळे यांच्या नातेवाईकांची दानवे, बापट, गोरे यांनी घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी नातेवाईकांनी हत्येमागील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असून, त्याला अटक करावे, कुटुंबीयांना शासनामार्फत आर्थिक मदत करावी, घरातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी केली. या वेळी दानवे, बापट यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे यांना बोलावून तपासाची माहिती घेतली. गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे, तसेच आळंदी परिसरात पोलिसगस्त वाढविण्याचे आदेश दिले.

या वेळी भाजप सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, किसान मोर्चा सरचिटणीस संजय घुंडरे, अशोक उमरगेकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, भाजप तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, शहराध्यक्ष भागवत आवटे, गटनेते पांडुरंग वाहिले, नगरसेवक सचिन गिलबिले, प्रशांत कुर्‍हाडे, संतोष गावडे, सुनीता रंधवे, गणेश राहणे, दिनेश घुले आदी उपस्थित होते. दरम्यान, आरोपी हा कांबळे यांचा मावस भाऊ असल्याचे प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे असून गुन्ह्यातील आरोपी कांबळे यांचे नातेवाईक नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

देहू रस्ता चौकात चौकी उभारा

देहू रस्ता परिसरात गुन्हेगारी फोफावली असून पोलिस चौकी नसल्याने कारवाईत दिरंगाई होते. नागरिकांनाही तक्रार दाखल करण्यासाठी दिघी ठाण्याला जावे लागते. त्यामुळे पालिकेच्या सर्वे नंबर 112 येथील भूखंडावर पोलिस चौकी उभारावी आणि कांबळे कुटुंबियांला आर्थिक मदत करावी, अशा मागण्यांचे निवदेन नगरसेवक सचिन गिलबिले यांनी दानवे व बापट यांना दिले.