Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Pune › निम्म्या एसटींचे टेल लॅम्प बंद 

निम्म्या एसटींचे टेल लॅम्प बंद 

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील निम्म्या म्हणजे पाचशे एसटींचे टेल लॅम्प (पाठीमागील दिवे) बंद आहेत.  विशेषतः पुण्याहून ग्रामीण भागात जाणार्‍या एसटींचे ब्रेक लाईट, इंडिकेटर, पार्किंग लाईट लागत नाहीत. भोर, लवासा, वेल्हा, निवे, नसरापूर, पानशेत, केडगाव आदी ठिकाणी धावणार्‍या बसचे पाठीमागील दिवे बंद आहेत.  याकडे एस. टी. महामंडळाचे  दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. 

एखादी एसटी वाटेत नादुरुस्त झाली तर पार्किंग लाईट सुरू केल्यास रात्रीच्या वेळी रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या अन्य वाहनांना गाडी बंद पडल्याचे दिसते. परंतु, पार्किंग लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी पाठीमागील वाहन जर वेगात असेल, तर अपघात होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बहुतांश एसटी बसेसचा ब्रेक दाबल्यावर लागणारा लाल रंगाचा ब्रेक लाईट देखील बंद असून, अन्य वाहनांना बस चालकाने ब्रेक दाबल्याचे कळतच नाही. स्थानकाजवळ किंवा अन्य ठिकाणी एसटी चालकाने अचानक ब्रेक दाबल्यास, पाठीमागून वाहन धडकू शकते. खास करून महामार्गावर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे निरीक्षण तज्ज्ञांनीही नोंदविले आहे.

पुणे विभागातून दररोज एक हजार एसटी बस दररोज विविध ठिकाणी ये-जा करतात. त्यापैकी तब्बल पाचशे बसेसचे टेल लॅम्प नादुरुस्त असून, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पाचशे बसेसपैकी दोनशे बसचे सर्व टेल लाईट बंद असून, तीनशे बसेसचे टेल लाईट अंशतः बंद असल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. पुणे विभागाअंतर्गत 13 आगार असून, दररोज सुमारे पाच हजार फेर्‍या होतात. त्यात तीन लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे विभागाला यातून दररोज एक कोटींचा महसूल मिळतो. परंतु, असे असतानाही प्रवाशांची सुरक्षा महामंडळाने वार्‍यावर सोडली आहे. मोठ्या अपघातानंतरच महामंडळ जागे होणार का, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

काय आहे नियम?

मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे असलेले दिवे सुस्थितीत असणे आवश्यक आहे. टेल लॅम्प बंद असल्यास संबंधित वाहनचालकाला शंभर ते पाचशे रुपये दंड होऊ शकतो. टेल लॅम्प सुरू असल्यास अपघाताचा धोका कमी होतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि दाट धुक्यामध्ये टेल लॅम्पची नितांत आवश्यकता असते. तसेच रात्रीच्या वेळी वाहन चालवताना पाठीमागील वाहनचालकाला अंदाज येण्यासाठी टेल लॅम्प कार्यरत असणे गरजेचे असते. वाहनांची देखभाल-दुरुस्ती करणे संबंधित चालक-वाहकाची जबाबदारी असून, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वाहनांचे ब्रेक लाईट, इंडिकेटर सुरू आहेत की नाही हे पाहून महामंडळाला कळवणे गरजेचे आहे.