Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Pune › जिल्ह्यातील निम्मी प्राथमिक आरोग्य केंद्र ‘स्कॉलर’

जिल्ह्यातील निम्मी प्राथमिक आरोग्य केंद्र ‘स्कॉलर’

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:03AMपुणे : नरेंद्र साठे

रुग्णाला सौजन्याची वागणूक, तत्काळ उपचार, रुग्ण पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत उपचार हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळत असल्याने जिल्ह्यातील निम्या केंद्रांवर ‘एनएबीएच’ची मोहर उमटली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 96 आरोग्य केंद्रांपैकी 48 आरोग्य केंद्रांना नॅशनल अ‍ॅक्रिडीटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल व हेल्थ केअर प्रोव्हायडर (एनएबीएच) मानाकंन मिळाले असून निम्मी प्राथमिक आरोग्य केंद्र ‘स्कॉलर’ ठरली आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर कसून आरोग्य केंद्राच्या गुणवत्तेवर भर दिल्याने आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढला. आरोग्य केंद्राच्या वतीने महिलांना प्रसूतीसाठी आणणे. प्रसूती झाल्यानंतर आईला सकस आहार देणे, याचबरोबर कमी वजनाच्या बाळासाठी आरोग्य केंद्रांमधून विविध तपासण्या केल्या जातात. यामध्ये अद्ययावत प्रयोगशाळा, प्रसूतिगृह, मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी, मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांसाठी ट्रॅक्शन सुविधा काही आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहेत़   या ठिकाणी स्वच्छता व रुग्णसेवेला प्राधान्य दिले जाते.

2016-17 या वर्षामध्ये 23 आणि 2017 - 18 या वर्षामध्ये 25 प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे मानाकंन प्राप्त झाले आहे. खासगी रुग्णालयाच्या तोडीची इमारत, आत प्रवेश करताच भासणारी प्रसन्नता, खासगी दवाखान्यासारखी स्वच्छता, डॉक्टर व सर्वच कर्मचार्‍यांची तत्परता व रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते या वैशिष्ट्यांसमवेत तत्परतेने मिळणारी सेवा या सर्व कारणांमुळेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांना एनएबीएचचे मानाकंन मिळाले आहे.

असे आहेत निकष

प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा, रुग्ण तपासणी, रुग्णांना प्रायव्हसी, रुग्णांचे उपचाराची प्रक्रिया, ओपीडी, यंत्रसामग्री असेल तर त्याचा वापर कसा होतो, किती यंत्रसामग्री बंद किंवा चालू अवस्थेत आहेत. याचबरोबर फायरचे मॉकड्रिल प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतले जातात. आपत्ती आल्यानंतर केले जाणार्‍या उपया योजनांची तपासणी करून त्याचे नियोजन पाहिले जाते. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार घेतलेल्या रुग्णांची प्रतिक्रिया जाणून घेतली जाते.