Sun, Aug 25, 2019 00:16होमपेज › Pune › निम्मे होर्डिंग्ज अधिकृत तर निम्मे अनधिकृत

निम्मे होर्डिंग्ज अधिकृत तर निम्मे अनधिकृत

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 10:31PMयेरवडा : उदय पोवार

अनाधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्सचे पेव केवळ शहरातील मुख्य चौकात नाही तर उपनगरात देखील पहायला मिळते. निम्मे होडींग्ज अधिकृत तर  निम्मे अनाधिकृत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर शेकडो फ्लेक्स तर विना परवाना लावले जात आहेत. यामुळे उपनगराचा देखील बकालपणा वाढला आहे. 

पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. याचबरोबर नुकत्याच झालेल्या सर्व्हेनुसार पुणे शहर देशातील रहाण्यासाठी योग्य शहर असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. असे असले तरी शहरात अद्याप अनेक मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव व बकालपणा दिसून येतो. त्यामध्ये होर्डिंग्ज व फ्लेक्समुळे शहर विद्रुपीकरण झाले आहे. त्याच लोण आता उपनगरात देखील सर्वत्र पहायला मिळत आहे. 

अनधिकृतपणे लावले जाणारे होर्डिंग्ज  व  फ्लेक्स याला नागरिक प्रचंड वैतागले आहेत. मात्र, अधिकृत होर्डिंग्ज मधून उत्पन्न मिळत असल्याने महापालिका होर्डिंग्जला परवानगी देते. आता तर होर्डिंग्ज ची परवानगी त्या-त्या हद्दीतील संबंधित क्षेत्रीय कार्यालयातून मिळत आहे. त्यामुळे उभारलेले सर्व अनाधिकृत होर्डींग्ज आता अधिकृत होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सद्यस्थितीत येरवडा क्षेत्रीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये सुमारे 59 होर्डीग्ज परवानाधारक आहेत. तर तेवढेच सुमारे 60 होर्डींग्ज अनाधिकृत आहेत. नुकताच धानोरी रस्त्यावरील भिमनगर येथे अनाधिकृत होर्डींग्ज उभारण्यात आलेले आहे. याशिवाय आळंदी रस्ता, येरवड्यातील नगर रस्ता, धानोरी रस्ता, टिंगरेनगर रस्ता, विमानतळ रस्ता अशा प्रमुख रस्त्यांवर अनेक अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत. याचबरोबर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये देखील कल्याणीनगर, नगर रस्ता, विमाननगर परिसरात अनेक अनाधिकृत होर्डींंग्ज आहेत. अनधिकृत होर्डिंग्जमुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. परवाना नसताना परवाना असलेली डुप्लीकेट पाटी लावली जात आहे. याशिवाय लाईट  देखील महापालिकेच्या पोलवरून अनधिकृत घेतली गेली आहे. 

अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे कारवाईल अडथळा

आकाश चिन्ह विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग याशिवाय कारवाईसाठी गेल्यावर लोकप्रतिनिधींचे येणारे फोन यामुळे ठोस अशी कारवाई होत नाही. होर्डिंग्जबरोबर अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांची संख्या दररोज शेकडोच्या घरात असेल. येरवडा पर्णकुटी चौक, पर्णकुटी पायथा, गुंजन चौक, विश्रांतवाडी चौक, गोल्फ चौक, फाईव्ह नाईन चौक यासह नगर रस्त्यावर विमाननगर चौक, चंदननगर बायपास अशा अनेक ठिकाणी अनाधिकृत फ्लेक्स रोज लागलेले असतात. त्याची परवानगी न घेताच हे फ्लेक्स लावले जातात. दिशादर्शक फलकारवही लांबच लांब असा फ्लेक्स वर चढून लावले जातात. व ते महिना-महिना तसेच असतात.