Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Pune › ‘आयात’ हाजी अराफतांना महामंडळ

‘आयात’ हाजी अराफतांना महामंडळ

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:15AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेले शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपच्या कोट्यातूनच आयोगाचे अध्यक्षपद  दिले गेल्याची चर्चा पाहता, आता स्वपक्षातील पिंपरी -चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना भाजप न्याय कधी देणार, याबाबत उत्सुकता आहे. 

शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख हे शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष होते. राज्यमंत्री मंडळातील दिवाकर रावते यांच्याशी खटके उडत असल्याने ते शिवसेना सोडण्याच्या मन:स्थितीत होते. त्याचा फायदा उठवत भाजपने त्यांना आपल्या गळाला लावले व आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावली. हाजी अराफत शेख यांनी दोनच दिवसांत भाजपप्रवेश केल्याने ही खेळी उघड झाली आहे. मात्र, मुस्लिम चेहरा म्हणून ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना न्याय कधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फारसे जमत नसलेले आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक व खास विश्‍वासातील म्हणून ओळखले जात. स्थायी समिती अध्यक्षपद व महापौर पदाबरोबरच पवार यांनी त्यांना हवेली विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. मात्र, दोन्ही निवडणुकीत पक्षांतर्गत फंदफितुरीमुळे त्यांना पराभावास सामोरे जावे लागले. पुढे सुमन पवळे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देताना विश्‍वासात न घेतल्याने पानसरे यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीचे सरकार असताना पानसरे यांना ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, त्यात ते समाधानी नव्हते. या अस्वस्थतेतून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, शरद पवार यांनी पक्षात सन्मान राखण्याचा शब्द दिल्याने विधानसभेला ते राष्ट्रवादीत परतले. विधान परिषदेला संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलून अनिल भोसले यांना उमेदवारी दिल्याने ते अस्वस्थ होते. 

पालिका निवडणुकीच्या तोंडावर पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला. त्याचा फायदा पालिका निवडणुकीत भाजपला झाला. सत्तांतर होऊन पालिकेत भाजपची सत्ता आली. यानंतर पानसरे यांना भाजप न्याय देईल, अशी अपेक्षा होती. 

मात्र, विधान परिषदेला भाजपने त्यांना डावलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच शहरात आले असता पानसरे समर्थकांनी त्यांची भेट घेऊन याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही पानसरेंना न्याय देण्याची अभिवचन दिले होते. मात्र, महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये पानसरे यांना डावलण्यात आले. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांना भाजपने आपल्याकडे ओढले. मात्र, स्वपक्षातील पानसरे यांना भाजप न्याय कधी देणार, असा प्रश्‍न केला जात आहे.