Tue, Jul 16, 2019 00:12होमपेज › Pune › बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाची बाजी

बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाची बाजी

Published On: May 30 2018 11:55AM | Last Updated: May 30 2018 12:08PMपुणे : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८८.४१ टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९४.८५ टक्के लागला आहे. या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९२.३६ टक्के आहे. तर, मुलांचे ८५.२३ एवढे टक्के आहे.

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेतील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वाधिक ९५.८५ टक्के आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९८.५० टक्के लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८२.१८ तर कला शाखेचा ७८.९३ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत कला शाखेचा निकाल ३ टक्क्यांनी कमी  लागला आहे.

राज्यात कोकण विभागाने ९४.८५ टक्क्यांसह बाजी मारली आहे. तर कोल्हापूर विभाग ९१ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वात कमी नाशिक विभागातील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत एकूण २१० विषयांची परिक्षा घेण्यात आली होती. त्यातील ५६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

विद्यार्थ्यांना उद्यापासून ( ३१ मे ) गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी ३१ मे ते ११ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे. 

विभागनिहाय निकाल
पुणे : ८९.५८, औरंगाबाद : ८८.७४, लातूर : ८८.३१, अमरावती : ८८.०८, नागपूर : ८७.५७, मुंबई : ८७.४४, नाशिक : ८६.१३

निकाल पाहा : http://mahresult.nic.in/

वेबसाईटवर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल २०१८ असे दिसेल. त्यानंतर परीक्षा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 

'एसएमएस'नेही समजणार निकाल

बारावीचा निकाल एसएमएसच्या माध्यमातून मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना MHHSC<space>SEAT NO त्यानंतर 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल समजू शकणार आहे. 

फेरपरीक्षा  जुलै - आॅगस्ट मध्ये

ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसाधर योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्‍च प्रविष्ट होण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०१८ आणि फेब्रुवारी-मार्च २०१९ या दोनच संधी राहणार आहे. तर बारावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये देता येणार आहे.