Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Pune › प्लॅस्टिक कचर्‍यात गुटख्याच्या पुड्यांचा ढीग

प्लॅस्टिक कचर्‍यात गुटख्याच्या पुड्यांचा ढीग

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

तरुणांमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी आरोग्याचा विचार करून राज्या शासनाने कोटींच्या महसुलावर पाणी ओतून राज्यात गुटखा बंदी केली आहे. मात्र, शहरामध्ये पुनर्निर्मिती न होणार्‍या प्लॅस्टिक कचर्‍यामध्ये सर्वांधिक कचरा गुटख्यांच्या पुड्यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात खरोखरच गुटखा बंदी आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

राज्य शासनाने केलेल्या प्लॅस्टिकबंदीनंतर शहरामध्ये गोळा होणारा प्लॅस्टिक कचरा, त्याचे वर्गीकरण करून सर्वांधिक पुनर्निर्मिती न होणारा प्लॅस्टिक कचरा कशापासून निर्माण होतो. हे पाहण्यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाची माहिती सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे प्रमुख राजेंद्र जगताप, स्वच्छ संस्थेच्या लक्ष्मी नारायण उपस्थित होत्या. 

महापालिका व स्वच्छ संस्थेच्या वतीने दि. 16 ते 20 मे दरम्यान बावधन, कोथरूड आणि गरवारे पूल नदीकाठी  सर्वेक्षण मोहिम राबवली. यामध्ये 87 टक्के प्लॅस्टिक कचरा हा देशी, तर 13 टक्के कचरा आंतरराष्ट्रीय ब्रँडचा असल्याचे निदर्शनास आले.  यात प्रामुख्याने गुटख्यांच्या पुड्या, दुधाच्या पिशव्या, कडक प्लॅस्टिक, शॅम्पू बाटल्या, वेफर्स, कुरकुरेंच्या पिशव्या, कॅरीबॅग आदी विविध स्वरूपाचे प्लॅस्टिक आढळून आले. यातील दूध पिशवी, कडक प्लॅस्टिक, शांपू बाटल्या आदी गोष्टी पुनर्निर्मिती (रिसायकल) करण्यासाठी पाठवले जाते. परंतु गुटखा, पानमसाल्याच्या पुड्या, शॉपूचे पाऊच, बिस्किटाचे पुडे, कुरकुरे, वेफर्सच्या पिशव्यांचे रिसायकल होत नसल्याचे समोर आले आहे. 

शहरात दररोज सुमारे 120 ते 130 प्लॅस्टिक कचरा तयार होतो. यापैकी केवळ 45 ते 50 टक्केच प्लास्टिक कचरा वेचकांमार्फत पुनर्निर्मितीसाठी पाठवला जातो. त्यामुळे तब्बल 50 टक्क्यांहून अधिक प्लॅस्टिकचा कचरा दररोज कोणत्याही प्रक्रियेविनाच पडून असतो. याबाबत ‘प्लॅस्टिक ब्रांड ऑडिट’ करून पुनर्निर्मिती न होणार्‍या प्लॅस्टिक कचर्‍यांचे वर्गीकरण करण्यात आले.