Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Pune › अहो, कुठाय गुटखा बंदी?

अहो, कुठाय गुटखा बंदी?

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:40AMपुणे : प्रतिनिधी

शहरात सध्या पावला-पावलावर मिळणारा गुटखा आणि खाणारे शौकीनही दिसून येत आहेत. त्यामुळे शहरात खरोखरच गुटखाबंदी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. राज्य सरकारने पाच वर्षांपूर्वी गुटखाबंदी करूनही तो सर्व ठिकाणी मिळत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर चढ्या दराने विक्री होत असल्याचे दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग झोपेचे सोंग घेत आहे.

सन 2014 मध्ये राज्य सरकाने गुटखा, पान मसाला यांचे उत्पन्न आणि विक्रीवर बंदी घातलेली आहे. पण, ही बंदी केवळ नावालाच आणि कागदावरच दिसून येत आहे. वास्तविक पाहता सर्व पान टपर्‍यांवर गुटखा मिळत असल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रोड, शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन, पेठा येथील सर्वच ठिकाणी हा गुटखा मिळतो. 

बंदी झाली त्यावेळी चोरून लपून आणि ओळखीच्याच व्यक्‍तींना दिला जाणारा गुटखा, आता खुलेआम सर्वांनाच दिला जात आहे. गुटखा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांचे भय राहिलेले नाही. पण इतक्या मोठया प्रमाणावर होणारी गुटख्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यास एफडीए विभाग हतबल ठरला आहे. 

सध्या दोन प्रकारच्या ब्रँडचा गुटखा जास्त प्रमाणात विकला जातो. दहा रूपायांपासून 60 रुपये या दरांत त्याची विक्री होते. हा गुटखा कोठून आणला जातो, त्याबाबत कोणताही विक्रेता माहिती देत नाही. गुटखा बंदी झाल्यापासून एकच बदल झाला, तो गुटख्याच्या पुडयांचा माळा ज्या पूर्वी टपर्‍यांवर दिसत होत्या त्या आता विक्रेते कागदाच्या पुडीत तर कुणी कापडाच्या पिशवीत ठेवतात. 

गुटख्याचे दुष्परिणाम

गुटख्याच्या सेवनाने तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. तसेच रक्‍तदाब, ह्रदयाचे ठोके अनियमित होणे, भूक हरवणे, झोपेच्या वेळा बदलणे, लक्ष विचलित होणे हे दिसून येते. तसेच लैंगिक जीवनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

एफडीएकडून प्रतिसाद नाही 

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पुणे विभागाचे सहआयुक्‍त शिवाजी देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.