होमपेज › Pune › गुजरात निकालामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

गुजरात निकालामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 12:26AM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

गुजरात विधानसभा निवडणुकीत  काँग्रेसला सत्तांतर घडविण्यात अपयश आले;  मात्र अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी घेतलेले कष्ट, काँग्रेसला मिळालेल्या लक्षणीय जागा यांमुळे काँग्रेसचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदारांनी हद्दपार केलेल्या शहर काँग्रेसमध्ये यामुळे उत्साह संचारला आहे.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेसला पालिका निवडणुकीतही मोठी हार पत्करावी लागली. पालिका निवडणुकीत काँग्रेसने 59 जागांवर उमेदवार उभे केले होते; मात्र शहरात पक्षाला मानणारा मोठा मतदार असताना निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते पदावरून पक्षात भाऊसाहेब भोईर व माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्यात झालेला संघर्ष, निवडणुकीत भोईर व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, या पडझडीबरोबरच राष्ट्रवादीबरोबर आघाडीच्या चर्चेत घालविलेला वेळ, ताकदीचे उमेदवार नगरसेवक सद्गुरू कदम यांचा बाद झालेला अर्ज यामुळे पक्ष ‘बॅकफुट’वर गेला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पिंपळे निलख येथे झालेली सभा, चित्रपट अभिनेते रजा मुराद यांचा ‘रोड शो’वगळता काँग्रेसच्या प्रचारात जोश नव्हता. शहराध्यक्ष सचिन साठे, संजीवनी जगताप, मृणाल साठे, भुलेश्‍वर नांदगुडे, तुकाराम भोंडवे, सज्जी वर्की, आशा वाकचौरे, राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसतर्फे रिंगणात उतरलेल्या मंदाकिनी ठाकरे, सुजाता टेकवडे; तसेच रमा भोसले यांचा अपवाद वगळता पक्षाला भाजप व राष्ट्रवादीशी लढत देऊ शकणारे सक्षम उमेदवार मिळाले नाहीत, त्यामुळे पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल आत्मचिंतन करून पक्षसंघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे अपेक्षित असताना, निवडणुकीतील पराभवाचे खापर शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या डोक्यावर फोडून पक्षातील एका गटाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली; मात्र पर्याय नसल्याने साठे हटाव मोहीम शांत झाली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याने  कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पिंपरी चौकात जो जल्लोष करण्यात आला त्यात सर्व कार्यकर्ते गटतट विसरून सहभागी झाल्याचे दिसले. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तो टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर काय प्रयत्न होतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हवी गुजरातसारखी जिद्द

महापालिकेत एकेकाळी सत्तेत असलेल्या व नंतर राष्ट्रवादीसोबत सत्तेची फळे चाखलेल्या काँग्रेसला महापालिका निवडणुकीत मतदारांनी हद्दपार केले. काळाच्या ओघात विरोधी पक्षनेते पद भूषविणार्‍या काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही याची  खंत कार्यकर्त्यांच्या मनात आहे. गुजरातसारखी जिद्द ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करू शकेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.