Thu, Aug 22, 2019 13:16होमपेज › Pune › पवना, इंद्रायणी सुधार योजनेसाठी गुजरातचे सहाय्य

पवना, इंद्रायणी सुधार योजनेसाठी गुजरातचे सहाय्य

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 1:04AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

गुजरात राज्यातील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना पिंपरी-चिंचवड महापालिका राबवित आहे. त्यासाठी साबरमती नदी स्वच्छ करून दाखविणार्‍या गुजरात राज्यातील अहमदाबादच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट कंपनीचे सहाय्य घेण्यात येत आहे. नदीकाठचा आराखडा तयार करणे, त्यावर पर्यटनस्थळासह व्यापारी संकुल उभारण्याकामी सल्लागार म्हणून कंपनी काम पाहणार आहे.

शहरातील सांडपाणी व मैलामिश्रित पाणी प्रक्रियेविना थेट पवना, इंद्रायणी व मुळा नदीत मिसळत आहे; तसेच औद्योगिक पट्टयातील रासायानिक दूषित पाणी थेट नाल्यात मिसळून नदीपात्रात जात आहे. त्यामुळे या तिन्ही नद्या मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाल्या आहेत. त्यामुळे नदीपात्रातून दुर्गंधी येत असून, उन्हाळ्याचा काळात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढून विशेषत: नदीकाठच्या नागरी वस्त्यांमध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

नदीसुधार योजनेचा पालिकेचा प्रस्ताव निधी नसल्याने कारण देत केंद्राने फेटाळला होता. त्यामुळे पालिकेने साबरबतीच्या धर्तीवर स्वत:च नदी सुधार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने दुसयर्‍यांदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात अहमदबादच्या एचपीसी कंपनीची निवड झाली आहे. शहरात पवना नदीचे अंतर 18 किलोमीटर असून त्यासाठी 2 कोटी 70 लाख आणि इंद्रायणी नदीचे 16 किलोमीटर अंतर असून, त्यासाठी 1 कोटी 78 लाख 40 हजार असा एकूण 3 कोटी 79 लाख 10 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. 

संबंधित कंपनी या दोन्ही नद्यांचे सर्व्हे करून नदी काठी पर्यटकांसाठी विकसित करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करणार आहे. डीपीआर  सादरीकरणानंतर प्राप्त झालेल्या सूचना व हरकतीप्रमाणे बदल करून तो अंतिम केला जाईल. काही ठिकाणी व्यापारी संकुल, हॉटेल्स, शॉपींग मॉलही उभारले जाणार आहेत. त्यासाठी किमान 6 महिने व कमाल 1 वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. ही योजना ‘पीपीपी’ तत्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे. शहर हद्दीतील मुळा नदीचा सुधार पुणे महापालिका करणार आहे. 

 

Tags : pimpri, pimpri news, Pawana Indrayani Improvement Scheme, Gujarat assistance,