Wed, Jul 17, 2019 18:17होमपेज › Pune › पालकमंत्र्यांची ठोस निर्णयाविना मॅरेथॉन बैठक

पालकमंत्र्यांची ठोस निर्णयाविना मॅरेथॉन बैठक

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

कचरा प्रकल्प, उड्डाणपुलांचे सुशोभीकरण, भामा आसखेड प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, मेट्रो, पंतप्रधान आवास योजना आदी प्रकल्पांविषयी माहिती घेण्यासाठी आणि त्यासंबंधी सूचना करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी महापालिकेत मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. तीन ते साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत तब्बल 20 विषयांवर चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय न झाल्याने बैठक केवळ चर्चेपुरतीच मर्यादीत राहिली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सोमवारी शहर आणि जिल्ह्यातील प्रश्‍नांसंदर्भात पालक मंत्री बापट यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

शहरात एकूण 57 उड्डाणपूल आहेत. त्यातील सहा उडडाणपुलांचे काम सुरु असून त्यासाठी डीपीडीसीतून निधी देण्यात येणार आहे. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेलेचे काम 31 मार्च 2019 अखेरीला पूर्ण होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेचे आठ  प्रस्ताव केंद्राकडे मंजूरीसाठी आहे. त्यातील 6 हजार 264 घरांच्या कामाला ऑगस्टमध्ये सुरुवात केली जाणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या 44   टाक्यांचे भूसंपादनाचे काम सुरु असून डिसेंबरपर्यंत 30 टाक्यांचे काम पुर्ण होणार आहे. वस्ताद लहुजी साळवे स्मारकाच्या  भूसंपादनासाठी 73.67 कोटी रुपयांची गरज आहे. नदी सुधार प्रकल्पाचे दोन्ही बाजूचे 500 मीटरचे सर्वेक्षण झाले आहे. 

शेवाळेवाडी येथे आरटीओ टेस्ट ट्रॅकसाठी 3.6 कोटी रुपयांची तरतूद आहे. याबरोबर मेट्रो, प्लॅस्टिक कचरा संकलन, लोहगाव विमानतळ विस्तारीकरण, जोडणारे रस्ते यांची माहिती घेतली. दीनदयाळ अपघाती विमा योजना, वैद्यकीय महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज सल्लागारांशी करार करणे, वैद्यकीय विद्यालयासाठी बाणेर येथे पाच एकर जागेचा ताब्यात आली आहे. समाविष्ट गावाचा विकास आराखडयावर चर्चा करण्यात आली. त्यात रस्ते, पाणी, सांडपाणी, घनकचरा, स्ट्रीट लाईटला पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येत आहे.

शहरात दीड लाख भटकी कुत्री 

भटक्या कुत्र्यांचे संगोपन या विषयावर बैठकीत चर्चा झाली. त्यात 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी कुत्री पकडण्याकरिता 15 नवीन गाड्या घेण्यात येणार आहेत. नायडू येथील केंद्रावर कुत्र्यांच्या नसबंदीची रोजची क्षमता 300 हून 600 पर्यंत वाढवणार आहे. शहरात एक ते दीड लाख भटकी कुत्री असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. 

पाणी कपातीवर चर्चाच नाही

काही दिवसांपूर्वी पर्वती जलशुद्धिकरण केंद्राच्या नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पालिका अधिक पाणी उचलते, असे वक्तव्य केले होते.  त्यानंतर  पीएमआरडीएनेही महापालिकेला पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला होता. यावरून सत्ताधार्‍यांवर विरोधक व पुणेकरांनी टीकेची झोड उठवली. हा विषय तापलेला असतानाही पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये या विषयावर कोणतीच चर्चा केली नाही. त्यामुळे पालकमंत्री पुणेकरांच्या पाणी प्रश्‍नावर कधी बोलणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.