Thu, Feb 21, 2019 11:06होमपेज › Pune › पुणे जिल्ह्यातील १७ गावांमधील भूजलपातळीत घट

पुणे जिल्ह्यातील १७ गावांमधील भूजलपातळीत घट

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:11AMपुणे : शंकर कवडे

पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भूजलपातळीत सरासरी 0.78 मीटरने वाढ झाली आहे. मात्र, 17 गावांतील भूजलपातळीत 1 ते 3 मीटरने घट झाल्याची नोंद भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने आपल्या अहवालात केली आहे. त्यामध्ये, पुरंदर, बारामती, शिरूर आणि हवेली तालुक्यांतील 17 गावांचा समावेश आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न तूर्ततरी उद्भवलेला दिसत नाही; मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर काही भागांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पुणे जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये सरासरी 845.8 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी तब्बल 1172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील 13 तालुक्यांत 192 निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पडलेला पाऊस आणि जलसंधारणाची कामे, यामुळे भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाणी जिरल्याने भूजलपातळीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. सर्वेक्षणातील अहवालानुसार जिल्ह्यातील भूजलपातळीमध्ये अर्ध्या टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 2.30 मीटरने सर्वाधिक पाणीपातळी वाढली आहे. तर भोर तालुक्यात 0.03 मीटर आणि आंबेगावात 0.05 मीटरने भूजलपातळीत वाढ झाली आहे. 

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील माळशिरस, मावाडी सुपे, पिसर्वे, टेकवडी तसेच बारामती तालुक्यातील उंडवडी, शिरूर तालुक्यातील अण्णापूर, डिंग्रजवाडी, कोरेगाव भीमा, शिरूर व सणसवाडी व हवेली तालुक्यातील सामोसवाडी, तराडे वस्ती आदी गावांमध्ये पाणीपातळीत 1 ते 2 मीटरने घट झाली आहे. तर हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी आणि शिरूर तालुक्यातील डोंगरगाव, म्हसे ब्रुद्रुक, निमगाव दुडे व टाकळी हाजी येथील गावांतील पाणीपातळी 2 ते 3 मीटरने घटली आहे.

सर्वेक्षण अहवालानुसार वरील गावांमध्ये यंदा सरासरी इतकाच पाऊस झाला असला, तरी भूजलपातळीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसून येत नाही. शासन निर्णयातील निकषानुसार पर्जन्यमानामध्ये वीस टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावात पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसते. भूजलपातळीत शून्य ते 1 मीटरने घट आढळून आलेल्या गावात पाणीटंचाईची शक्यता कमी असून, ती नियंत्रित ठेवण्यासारखी असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी सांगितले.