Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Pune › सांगा, आम्ही खेळायचे कुठे?

सांगा, आम्ही खेळायचे कुठे?

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:20AMपिंपळे गुरव ः प्रज्ञा दिवेकर

सध्या मे महिन्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा विविध खेळ खेळण्याकडे कल वाढतो; परंतु खेळण्यासाठी नवी सांगवी, पिंपळे गुरव, सांगवी याठिकाणी मैदानेच राहिली नसल्याने मुलांना खेळण्यासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे.  क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख असताना या परिसरातील मुलांना मात्र खेळायचे कुठे असा प्रश्‍न पडत आहे. पिंपळे गुरव परिसरात जलसंपदा विभागाअंतर्गत  एकमेव पीडब्ल्यूडी मैदान आहे.

34 एकरवर पसरलेल्या या मैदानाला अधिकृत खेळाचे मैदान म्हणून अद्यापही मान्यता मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडब्ल्यूडी मैदानावर गावपातळीवर सर्व्हे नंबर 72 अंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबरीने पिंपरी चिंचवड महापालिकेने मैदानावर बॅडमिंटन हॉल, पोहण्याचा पूल उभारला आहे ; परंतु मैदानाला अधिकृत मान्यता न मिळाल्याने याठिकाणी अतिक्रमणे,  मैदानाच्या पदपथांवर गाड्यांचे बेशस्त पार्किंग केले जात आहे. मान्यतेअभावी पीडब्लूडी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून विकास करताना राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आणि दबावाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत सांगवी विभागाचे उपअभियंता मुकेश विरनक म्हणाले की, पीडब्लूडीची जागा खेळासाठी आरक्षित करण्यासाठी आमचा मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. पिंपरी चिंचवड नगररचना आणि विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर म्हणाले की, पीडब्लूडी मैदानाला आरक्षित करण्याचा प्रस्ताव  प्रक्रियेमध्ये आहे.

मैदान म्हणजे प्रेमीयुगुलांचा ‘लवर पाईंट’

सकाळ - संध्याकाळी मैदानावर तळीरामांचा अड्डा भरतो. मुलांनाच मैदानाची स्वच्छता करावी लागते.  मैदानावर मंडप, पाळणाघर तसेच ठिकठिकाणी पडलेले खड्डे, बस पार्किंग यामुळे खेळाडूंना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मैदानावर गाड्या शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याने याठिकाणी कारचालकांची गर्दी होते. त्यातच हे मैदान म्हणजे प्रेमी युगुलांचा लवर पॉईंटच झाला आहे. त्यामुळे आणखी किती दिवस खेळाडूंना मैदानाची  प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.