Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Pune › महारेरातर्फे तक्रार निवारण मंचची स्थापना

महारेरातर्फे तक्रार निवारण मंचची स्थापना

Published On: Jan 31 2018 2:18AM | Last Updated: Jan 31 2018 2:10AMपुणे :

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘महारेरा’कडे दाखल होणार्‍या ग्राहक आणि विकासक यांच्यातील तक्रारींची संख्या कमी व्हावी व त्या कायदेशीर प्रक्रियेत जाण्याआधी योग्य संवादाद्वारे त्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने राज्यात प्रथमच एका तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आली आहे. अशा तर्‍हेचा रेराअंतर्गत मंच स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून सदर मंचाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.  हा मंच प्रथम पुणे, मुंबई, मुंबई मेट्रोपॉलिटिन रीजन ( एमएमआर , प्रामुख्याने ठाणे आणि नवी मुंबई चा परिसर ) इथे सुरू होत असून नंतर गरजेनुसार राज्याच्या इतर शहरांमध्येही असे मंच स्थापन केले जातील 

या पत्रकार परिषदेच्यावेळी कॉन्फीडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजीत नाईकनवरे, मुंबई ग्राहक पंचायतीचे पुण्यातील प्रतिनिधी शिरीष मुळेकर, विश्वस्त ललिता कुलकर्णी, महारेराचे तांत्रिक प्रमुख ज्ञानेश्वर हडदरे, केपीएमजी या संस्थेचे रोशन यादव यांबरोबर क्रेडाई आणि ग्राहक पंचायतीचे तक्रार निवारण मंचाचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

‘महारेरा’च्या माध्यमातून मुंबईत 10 तर पुण्यात 5 केंद्रे स्थापन करण्यात आली असून सुरुवातील पुण्यातील केंद्रे औंध येथील महारेरा कार्यालय व कॅम्प परिसरातील क्रेडाई पुणे मेट्रोचे कार्यालय येथून कार्यरत असतील, अशी माहिती यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांनी दिली.

क्रेडाई, पुणे तर्फे रोहित गेरा, अनिल फरांदे, मनीष जैन, अमर मांजरेकर, आय. पी. इनामदार हे सदस्य या मंचाचे सदस्य असतील तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागातर्फे ललिता कुलकर्णी, शिरीष मुळेकर, केशव बर्वे, तनुजा राहणे, कल्पिता रानडे आणि संजीव कुलकर्णी हे सदस्य असतील असे शांतीलाल कटारिया यांनी जाहीर केले.

विशेष म्हणजे फक्त महारेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांसंदर्भातच तक्रारी सदर मंचाअंतर्गत घेतल्या जाणार असून येत्या 1 फेब्रुवारी पासून ‘महारेरा’ च्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येणे शक्य होणार आहे. प्रत्यक्ष सुनावणीला  मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात होईल.याशिवाय बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोघांच्या संमतीने या मंचापुढे सुनावणी होणार असून जर 45 दिवसात समाधानकारक तोडगा निघाला नाही तर तक्रारदाराला ‘महारेरा’ पुढे अपील करता येणे शक्य असल्याचा खुलासा यावेळी सुहास मर्चंट यांनी केला. ग्राहक फोरममध्ये या आधी दाखल झालेली प्रकरणे  या मंचावर न्यावयाची असतील तर प्रथम ती  तेथून काढून घ्यावी लागणार आहेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.तक्रारदाराला शुल्कापोटी 1 हजार रूपये आणि जीएसटी ची रक्कम द्यावी लागणार आहे. विकसक या पध्दतीच्या तक्रार निवारणास राजी असल्यास  त्यांनी तसे तक्रारदाराच्या तक्रारीनंतर 7 दिवसांच्या आत मंचकडे कळविणे बंधनकारक आहे.