Thu, Apr 25, 2019 07:49होमपेज › Pune › नदीपात्रातील मेट्रोला हिरवा कंदील

नदीपात्रातील मेट्रोला हिरवा कंदील

Published On: Jan 15 2018 7:25AM | Last Updated: Jan 15 2018 1:50AM

बुकमार्क करा
पुणे : महेंद्र कांबळे 

पूर परस्थितीत मेट्रोमुळे नदीच्या प्रवाहावर तितकासा परिणाम होणार नसल्याचा अहवाल तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) सादर केला आहे. असे असले तरी समितीने अटी शर्तींचे पालन करण्याचे अहवालामध्ये सूचित केले आहे.   न्यायाधिकरणाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने नुकताच न्यायाधिकरणाकडे अहवाल सादर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समितीने दिलेल्या सकारात्मक अहवालामुळे मेट्रोला अप्रत्यक्षरित्या हिरवा कंदील मिळाला आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या आणि वनाझ ते रामवाडी या मार्गावरील नदीपात्रातून जाणार्‍या मार्गाला पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. यामुळे नदीची वहनक्षमता कमी होणार असल्याची याचिका ‘एनजीटी’मध्ये दाखल आहे. त्यानुसार याप्रकरणी समिती नेमण्याबाबत न्यायाधिकरणाने सुचविल्यानंतर याला महामेट्रोने विरोध दर्शविला होता. त्यानंतर न्यायाधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मेट्रोच्या नदीपात्रावरील मार्गावर सविस्तर अहवाल देण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने त्याचे सर्वेक्षण पूर्ण केले. या समितीकडून नोव्हेंबर 2017 मध्ये एनजीटीकडे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1.7 किलो मीटर नदीपात्रातून जाणार्‍या मेट्रोमुळे बाधा येईल का नाही, याबाबत समितीने अनुमान काढले आहे. त्यामध्ये समितीने अटी व  शर्तींची पूर्तता करून या पट्ट्यात जो भाग नदीपात्रातून जातो तेथे मेट्रोचे काम करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. नदीपात्रात उभारण्यात येणार्‍या खांबाची रचना समांतर असल्यामुळे पुराचे पाणी वाहत आले तरी पाण्याच्या प्रवाहावर तितकासा परिणाम होणार नाही. पावसाळ्यात एक लाख क्युसेक पाणी सोडले तरी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नसल्याचे समितीने म्हटले आहे. 

प्रकल्पपूर्ण करण्याापूर्वी समितीने काही निर्देश दिले आहेत. मेट्रोच्या या परिसरातील पूर्ण वाढ झालेल्या 32 पैकी 23 वृक्षांचे त्या परिसरात पुर्नरोपण करावे, महापालिकेने नियमानुसार या तीनपट झाडे लावावीत असेही समितीने म्हटले आहे. पालिकेने मैला पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडावे असेही सुचविले गेले आहे.