Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Pune › ग्रीकोरोमन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : ऋषीकेश पाटील, अतुल माने रौप्यपदकाचे मानकरी

ग्रीकोरोमन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : ऋषीकेश पाटील, अतुल माने रौप्यपदकाचे मानकरी

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:32PMपुणे : प्रतिनिधी

37 व्या मुलांच्या ग्रीकोरोमन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दुस-या  दिवशी महाराष्ट्राच्या मल्लांना छाप पाडता आली नाही. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतानाही महाराष्ट्राच्या मल्लांना  दोन रौप्य आणि तीन ब्राँझपदकांवर समाधान मानावे लागले. ऋषिकेश  पाटील (45 किलो) आणि अतुल माने (110 किलो) या दोघांना रौप्यपदक मिळाले. तर, प्रविण पाटील (51 किलो), विश्वजीत पाटील (60 किलो) कांस्यपदकाचे मानकरी ठरले.

स्वामी समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री नॅशनल स्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल तसेच महाराष्ट्र  कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे. महाराष्ट्राच्या अतुल माने याने आपली धाकटी बहीण रेश्मा मानेचा  कित्ता गिरवला. मात्र, तो सुवर्ण पदक मिळवू शकला नाही. विजेतेपदाच्या शर्यतीत त्याला पंजाबच्या नरिंदरकडून 3-7 असा पराभव पत्करावा लागला.

कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करणा-या अतुलला आता अधिक सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तो प्रथमच खेळला आणि रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राला दुसरे रौप्यपदक मिळवून देणारा ऋषिकेश पाटील मुळचा कोल्हापूरचा असला, तरी तो बीईजीमध्ये सराव करतो. शिवशंकर भावले, प्रताप शिंदे यांच्याकडे तो सराव करतो. घरातून कुस्तीचा वारसा नसला, तरी मेहनतीने ऋषिकेशने कुस्तीत आपले नाव कमावले आहे. खेलो इंडिया स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. साईच्या अतंर्गत राष्ट्रीय स्पर्धेत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. स्पर्धेच्या दुस-या दिवशी देखील हरियानाने आपले वर्चस्व कायम राखले. ग्रीको रोमन प्रकारातही त्यांनी 190 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. दिल्ली 137 गुणांसह दुस-या तर उत्तरप्रदेश 136 गुणांसह तीस-या क्रमांकावर राहीले. 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 45 किलो : रोहन भोसले (सेनादल), ऋषिकेश पाटील (महाराष्ट्र), अमनदीप (हरियाना), अमित (उत्तर  प्रदेश). 51 किलो : लैशराम सेयॉन (सेनादल), के. लोयांगम्बा (मणिपूर), कुमार वडार  (गुजरात), प्रविण पाटील (महाराष्ट्र). 60 किलो : प्रवेश (साई), जितेंदर पटेल (उत्तर  प्रदेश),  विश्वजीत पाटील (महाराष्ट्र), रवी (हरियाना). 92 किलो : नितेश (हरियाना), नविन (दिल्ली), गौरव (उत्तर प्रदेश), विशु (चंडिगड). 110 किलो : नरिंदर (पंजाब), अतुल माने (महाराष्ट्र),  रोहित (हरियाना), प्रवेश (हरियाना).