Thu, Aug 22, 2019 08:35होमपेज › Pune › नातवंडे सांभाळत बसायला आजी-आजोबा बेबीसीटर नव्हे! 

नातवंडे सांभाळत बसायला आजी-आजोबा बेबीसीटर नव्हे! 

Published On: May 23 2018 1:45AM | Last Updated: May 23 2018 1:45AMपुणे ः प्रतिनिधी 

मुलांचा सांभाळ करणे हे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. ती जबाबदारी आजी-आजेबा यांच्यावर टाकता येणार नाही. आजी-आजोबा हे मदतनीस किंवा सल्लागाराच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यावर नातवांना सांभाळण्याचे ओझे लादता येणार नाही. ते काही बेबीसीटर नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पुणे कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश स्वाती चौहान यांनी दिला. याचिकाकर्त्या महिलेलाही न्यायालयाने चांगलेच फटकारले. वडिलांनी प्रत्येक मुलास दहा हजार रुपये देखभाल खर्चाकरिता द्यावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले. 

पुण्यातील एका महिलेने दाखल केलेळी याचिका निकाली काढतांना न्यायालयाने सांगितले, की  भारतीय कुटुंब व्यवस्थेत आजी-आजोबा हे मुलांचा सांभाळ करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, अशा प्रकारे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी जबरदस्तीने टाकता येणार नाही. त्यांना त्यांचे उतार वय त्यांच्या पद्धतीने  जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. सासू-सासरे व पती दोन मुलांचा सांभाळ करत नसल्याने त्यांना पाळणाघरात ठेवावे लागत असल्याचा दावा महिलेने याचिकेत केला होता.  तक्रारदार महिला ही 40 वर्षाची असून 20 वर्षापूर्वी तिचे लग्न झालेले आहे. सन 2012 मध्ये तिने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून देखभाल खर्च मिळावा, अशी मागणी केली होती.

 तिचा मोठा मुलगा दहा वर्षाचा असून पती आर्थिक गरजा भागविण्यास असमर्थ असल्याने तिला नोकरी करावी लागत होती. मात्र, मुलगा चार महिन्यांचा असताना तिला नोकरी सोडावी लागली होती. काही दिवस सासू-सासरे यांनी मुलांचा सांभाळ केला. मात्र, त्यानंतर ते दुसर्या मुलाकडे राहण्यास गेले. त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवून महिलेने पुन्हा नोकरी सुरू केली. मागील एक दशकापासून तिचा पती तिची आणि मुलांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुराव्यांवरून मागील एक दशकापासून वडिलांनी मुलांना मदत दिली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयाने संबंधित महिलेच्या पतीने मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत, तर मुलीचे लग्न होईपर्यंत त्यांचा शिक्षणाचा व देखभालीचा खर्च करावा, असे निकालात नमूद केले. मुलांची आई नोकरी करत असल्याने मुलांचे इतर छंद व अन्य गोष्टींवर तिने खर्च करावा, असेही आदेशात म्हटले आहे. 

आजी-आजोबा फक्त मार्गदर्शनासाठी...

आपल्या लहान मुलांची काळजी घेणे ही आजी-आजोबांची नाही तर पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे.  अनेक महिला सुशिक्षित होऊन पतीप्रमाणे नोकरी करतात. त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवण्यास लागणे यात कसलेही आश्‍चर्य नाही. मात्र, त्याबाबत आजी-आजोबांवर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. आजी-आजोबांना त्यांची स्वत:ची तब्येत, इच्छा, प्रवासाचे नियोजन, इतर कार्यक्रम हे लक्षात घेऊन नातवंडांचा सांभाळ करायचा की नाही ठरविण्याचा पूर्ण हक्क त्यांना आहे. आजी-आजोबा मार्गदर्शन करण्याकरिता तसेच पाठिंबा देण्याकरिता आहेत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे अयोग्य असून उतार वयात नातवंडांचे ओझे त्यांच्यावर टाकले जाऊ नये.