Fri, Jan 18, 2019 00:41होमपेज › Pune › तुमच्या ग्रामपंचायतीची तिजोरी शाबूत आहे?

तुमच्या ग्रामपंचायतीची तिजोरी शाबूत आहे?

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:24PM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

गावोगावचा विकास करण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासनाच्या वतीने ग्रामपंचायतीची तिजोरी ग्रामसेवकांच्या हातात दिली आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामविकास आणि आर्थिक अनियमिततेच्या फरकामुळे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची तिजोरी शाबूत आहे की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण मागील काही महिन्यांच्या कालावधीत आर्थिक घोटाळा आणि करवसुलीत अनियमितता केल्यामुळे 13 ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर विविध कारणांमुळे 11 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दिली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आधिपत्याखाली राहून गावचा विकास करणे प्रत्येक ग्रामसेवकाला बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने अनेक अधिकार ग्रामसेवकांना बहाल करण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यात दुर्गम आणि अप्रगत गावात काम करणार्‍या काही  ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभाराचा फटका ग्रामपंचायतींना बसत आहे.

करवसुलीतून ग्रामविकास करण्याऐवजी आर्थिक घोटाळा करणार्‍या 13 ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पंचायत समितीला गावदफ्तर वेळेत सादर न करणे, बिलाचे व्हाऊचर न दाखविणे, गटविकास अधिकार्‍यांच्या बैठकीला गैरहजर राहणे, ऑनड्यूटी कामावर हजर न राहता इतरत्र फिरणे अशा कारणांमुळे 11 ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी सहा जणांना कारवाईनंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. दरम्यान, काही कामचुकार ग्रामसेवकांमुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी चांगले काम करणार्‍या ग्रामसेवकांच्या कामाला बट्टा लागत आहे.

ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करताना करवसुलीद्वारे गावविकास करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. करवसुलीतून गावचा पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट गाव करणे; तसेच  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.  मात्र, जिल्ह्यातील काही ग्रामसेवकांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे ग्रामविकास खुंटला जात आहे.

त्यामुळे अशा ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे, तर गावदफ्तर सांभाळताना हलगर्जीपणा करणे, कर्मचार्‍यांवर नियंत्रण न ठेवणे, व्हिलेज फंडात घोळ करणार्‍या ग्रामसेवकांना घरचा रस्ता दाखविण्यात पंचायत विभागाने कुचराई केली नाही. 2016-17 मध्ये सर्वाधिक ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही गावचे सरपंच, नागरिक अशिक्षित असल्याने काही ग्रामसेवकांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे बोलले जात आहे.