Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Pune › खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस

खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस

Published On: Aug 07 2018 1:23AM | Last Updated: Aug 07 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सर्व दप्तर इ-ग्राम या सॉफ्टवेअरमध्ये भरले आहे. 162 ग्रामपंचायतींच्या 1 ते 33 नमुन्यांतील माहिती सूचीबद्ध पद्धतीने साठवण्यात आल्याने सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज हे संगणकाद्वारे होत आहे. 

सध्या नागरिकांना संगणकीकृत दाखले वितरित करण्यात येत आहेत. अशाप्रकारे काम करणारा खेड तालुका राज्यामध्ये अव्वलस्थानी आल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्यव्यापी आयटी नेटवर्क तयार केले. सर्व ग्रामपंचायतींच्या कामकाजामध्ये एकसूत्रता व सूचीबद्धता आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला होता. आपले सरकार सेवा केंद्राद्वारे पंचायतराज संस्थांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांची कामे लवकरच पेपरलेस  होण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी यामध्ये पुढाकार घेऊन पेपरलेस कारभार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, साहायक गटविकास अधिकारी, सर्व ग्रामसेवकांच्या कामामुळे सध्या जिल्हा परिषदमध्ये त्यांच्या कामाची चर्चा सुरू आहे.